यशराज फिल्म्स बॅनरचे ‘प्रेम’चित्रपट म्हणजे युरोपमधील निसर्गरम्य लोकेशन्स, चिंब पाऊस, घट्ट मिठय़ा आणि त्याचबरोबर मातब्बर कलावंत, उंची सेट्स, चकचकीत निर्मिती मूल्ये असा सगळा मामला असतो. परंतु, आता बदलत्या काळानुसार आणखी एक रोमॅण्टिक चित्रपट बनविताना थोडा वेगळा प्रयत्न केला जातोय. ‘शुद्ध देसी रोमान्स’ असे या वेगळ्या चित्रपटाचे नाव असून ‘काय पो चे’ आणि ‘पवित्र रिश्ता’फेम सुशांत सिंग राजपूत आणि यशराजची अभिनेत्री व ‘इशकजादे’फेम परिणीती चोप्रा ही जोडी त्यात झळकणार आहे. ‘काय पो चे’द्वारे दमदार पदार्पण करून सुशांत सिंगने छोटय़ा पडद्याप्रमाणेच मोठय़ा पडद्यावरही आपले अस्तित्व दाखवून दिले. त्यामुळे लगेचच त्याला यशराज फिल्म्ससारख्या बडय़ा बॅनरच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘इशकजादे’ असो की ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ आपल्या गोड चेहऱ्याने तरुणाईला भुरळ घालणाऱ्या परिणीतीचा हा दुसरा रोमॅण्टिक चित्रपट आहे. ‘बॅण्ड बाजा बारात’चे दिग्दर्शक मनीष शर्मा यांनाच यशराजने पुन्हा दिग्दर्शनाची संधी दिली आहे. प्रेमकहाणीभोवती फिरणारे कथानक असले तरी रोमॅण्टिक कॉमेडी प्रकारचा हा चित्रपट आहे. महानगरीय जीवनशैली, तथाकथित गर्भश्रीमंत जोडय़ांचा रोमान्स, परदेशांतील ठिकाणे अशी पडद्यावरची श्रीमंती दाखविणाऱ्या यशराजने या वेळी देशांतील निमशहरांतील संस्कृती, रांगडेपणा दाखविण्याचे ठरविलेले दिसतेय. अलीकडे निमशहरे किंवा तालुक्याच्या ठिकाणचे तरुणाईचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न हिंदी चित्रपटांतून अधिक केला जातो. आता यशराजनेही या नव्या चित्रपटाद्वारे छोटय़ा शहरांतील तरुण-तरुणीचा रोमान्स दाखविण्याचे ठरविले आहे.