Untitled-1डोंबिवली टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत पाथर्ली येथील अर्जुननगर कॉम्प्लेक्स येथील मुलांनी बांधलेल्या राजगडला प्रथम क्रमांक, आयरे रोडवरील बाल गोपाळ उत्सव मंडळचा किल्ले विजयदुर्ग द्वितीय तर न्यू श्रेयस सोसायटी सी.के.पी. हॉलमधील किल्ले पन्हाळगडाला तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
डोंबिवली शहरातील पन्नास सोसायटय़ांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून गिरीप्रेमी विवेक वैद्य, श्रीकांत तिम्मापुरे आणि सुहास दांडेकर यांनी काम पाहिले. देवेंद्र कुलकर्णी, प्रथमेश खानोलकर, प्रतीक वेलकरण यांनीही त्यांना परीक्षणात मदत केली. किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृतींबरोबरच त्या किल्ल्यांच्या वैशिष्टय़ांची, तेथील ठिकाणांची, किल्ल्याच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती देऊन रसिकांच्या सर्व शंकांचे निरसन करून किल्ल्याची खरी ओळख करून देणाऱ्या मंडळांचीच पारितोषकांसाठी निवड करण्यात आल्याचे परीक्षक विवेक वैद्य यांनी स्पष्ट केले. मुलांप्रमाणेच या स्पर्धेस मुलींचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. याचप्रमाणे कचरू भवन येथे शिवनेरी किल्ला, साईदत्त निवास येथे खांदेरी किल्ला, साई संदेश सोसायटीत वेताळवाडी, लक्ष्मीकांत सोसायटीत मुरुड जंजिरा, रघुनाथ पाटील चाळ येथे सिंधुदुर्ग किल्ला, तर उदयाचल सोसायटीमध्ये काल्पनिक किल्ला उभारण्यात आले होते, या सर्व किल्ल्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.