भाजप युवा मोर्चाची मदार प्रथमच महिलेकडे

भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार पंकजा पालवे यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळेच मराठवाडय़ात युवकांचे संघटन उभे करणे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे.

‘ताई’ नेतृत्व ‘लय भारी’ असल्याचे सांगत युवती संघटन राजकीय व्यवस्थेचा मुख्य भाग बनेल, अशी मांडणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाते. मराठवाडय़ात पाळेमुळे रुजविण्यासाठी राष्ट्रवादीने बरेच प्रयत्न केले. तुलनेने काँग्रेसचे संघटन कुपोषित असल्यासारखे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार पंकजा पालवे यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळेच मराठवाडय़ात युवकांचे संघटन उभे करणे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे.
मराठवाडय़ात एकीकडे विविध जाती-संघटनांनी डोके वर काढले. त्याला राजकीय पाठबळही दिले जाते आहे. अशा वातावरणात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आव्हान असल्याचे आमदार पंकजा पालवेही मान्य करतात. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन व खासदार गोपीनाथ मुंडे यांनीही हे पद पूर्वी भूषविले. त्यामुळे या पदाची जबाबदारी अधिक आहे. कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणार नाही, तर युवकांचे संघटन व त्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी ‘रिचार्ज’ करणे हे उद्दिष्ट असल्याचे आमदार पालवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
राज्याच्या राजकारणात ‘लोकनेता’ म्हणून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची नेहमीच चर्चा असते. पवारांनी त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युवती राष्ट्रवादीचे व्यासपीठ उभे करून दिले. सामाजिक, आर्थिक तसेच कला क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या भेटी घेत युवतींच्या माध्यमातून त्यांनी संघटन उभारणीसाठी कार्यक्रम घेतले. राजकीय क्षेत्रात महिला नेतृत्वाची पोकळी त्या भरून काढतील, असे राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आवर्जून सांगत. या पाश्र्वभूमीवर अन्य पक्षात मात्र महत्त्वाच्या पदांची जबाबदारी महिलांकडे आवर्जून दिली जात नसल्याचे चित्र आहे. विशेषत: मराठवाडय़ात तर त्याची वानवाच म्हणावी, असे वातावरण आहे.
काँग्रेसमध्ये रजनीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, सूर्यकांता पाटील, उषाताई दराडे, सुशीला मोराळे, शिवसेनेच्या आमदार मीरा रेंगे ही नावे वगळली, तर उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर, औरंगाबाद जिल्ह्य़ांमध्ये तसे नेतृत्व उभे राहिले नाही. महिलांनी महिलांच्या क्षेत्रात नेतृत्व करावे, असा जणू संदेशच आतापर्यंत दिला जात असे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीमुळे तो अधोरेखित झाला. त्यामुळे पुरुष व महिला यांचे नेतृत्व महिलेकडे असावे, अशी बांधणी पक्षीय पातळीवर फारशी झाली नाही.
भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी पंकजा पालवे यांची नेमणूक त्या अर्थाने वेगळी असल्याचे सांगितले जाते. केवळ युवतींसाठी काम नाही तर युवा वर्गासाठी काम करू. भाजपमधील महिला संघटन अनेक वर्षांपासून मजबूत आहे. राष्ट्रीय स्तरावरही महिलांनी नेतृत्व केले आहे. त्यामुळे युवकांचे संघटन उभे करण्यास कोठेही मागे पडणार नाही, असे आमदार पालवे सांगतात.
आमदार पालवे यांच्या नियुक्तीनंतर भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर यांच्याविषयी मात्र उलटसुलट चर्चाना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. वेगवेगळ्या कार्यक्रमात खासदार मुंडे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या त्यांच्या वागणुकीवरून कुजबूज सुरू होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बारामतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या अनुषंगाने त्यांना थेट विचारले असता, पक्ष बदलण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पक्ष पातळीवर सुरू असणारी सुंदोपसुंदी व संघटन बांधणीत राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे उपक्रम याला पंकजा पालवे कसे सामोरे जातात, यावर बरेच अवलंबून असेल. मात्र, या निमित्ताने दोन मोठय़ा नेत्यांच्या लेकींच्या नेतृत्वाची तुलना मात्र केली जाईल, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: First time lady become bjp youth leader in state