राज्यातील एक श्रीमंत पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीवर राष्ट्रवादीच्या नेरुळ विभागातील नगरसेविका नेत्रा शिर्के यांची बुधवारी निवड झाली. त्यांनी शिवसेनेच्या कोमल वास्कर यांचा दोन मतांनी पराभव केला. सुमारे अडीच हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या नवी मुंबईच्या स्थायी समितीवर पहिल्यांदाच महिला सभापती विराजमान झाल्या असून त्यांच्या हाती तळ गाठलेल्या तिजोरीच्या चाव्या देण्यात आलेल्या आहेत. उच्चशिक्षित असलेल्या नेत्रा शिर्के यांनी यापूर्वी दोन विशेष समित्यांचे सभापतिपद भूषविले असून माजी मंत्री गणेश नाईक यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात.१ ऑगस्टपासून राज्यातील एलबीटी रद्द होणार आहे. तशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशानात केलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेला एलबीटीमधून मिळणाऱ्या ८५० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. त्या बदल्यात राज्य सरकार ही रक्कम देणार आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीचे सरकार असून राज्यात युती शासन आहे. त्यामुळे हे अनुदान मिळताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पालिकेच्या समोर आता मालमत्ता कराचे हुकमी उत्पन्न असून करवाढ करणार नाही असा शब्द राष्ट्रवादीने दिला असल्याने त्यात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. पालिकेत पुन्हा सत्ता येईल की नाही याची खात्री नसलेल्या राष्ट्रवादीने लोकसभा, विधानसभा आणि पाालिका निवडणुकीत करोडो रुपयांची नागरी कामे काढली आहेत. यात सुस्थितीत असलेल्या पदपथ व गटारींच्या जागी नवीन कामे काढण्यात आल्याने हा आकडा ८०० कोटींच्या घरात गेला आहे. ही कामे करणाऱ्या ठेकेदारांना देण्यास पालिकेकडे निधी नाही अशी स्थिती येऊन ठेपली आहे. पालिकेच्या ४५० कोटी रुपयांच्या ठेवी विविध बँकेत असून त्याचा उपयोग वेळप्रसंगी कामगारांचा पगार देण्यास करण्याची वेळ येणार आहे. अशा तळ गाठलेल्या पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीने पहिल्यांदाच एका महिलेच्या हातात दिल्या आहेत. घरात काटकसर करून घर चालविण्याचा अनुभव असणारी महिला अशा आर्थिक अडचणीत पालिकेचा कारभार कसा चालविणार ते येत्या काळात नवी मुंबईकरांना दिसून येणार आहे. शिर्के उद्योजक असून निवडणूक काळात त्यांनी त्यांची संपत्ती दहा कोटींच्या घरात जाहीर केली होती.