महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढय़ात अहिंसेचे धारदार शस्त्र आपल्याला दिले. त्यांचा लढा, स्वराज्याची त्यांची कल्पना, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वांचा त्यांनी केलेला स्वीकार या सगळ्या ऐतिहासिक गोष्टींचे ज्ञान आपल्या सर्वाना असते. मात्र, खंबीरपणे ब्रिटिश साम्राज्याशी लढा देताना आपल्या तत्त्वांवर ठाम राहण्याची आणि आपली तत्वे किती खरी आहेत हे कृतीतून सिध्द करण्याची त्यांची जबरदस्त ताकद कुठून आली, याचा विचार आपण कधीच करत नाही. तंदुरूस्त आरोग्यासाठी ‘ट्रेडिंग मिल’ वर पळण्यापलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत हे लक्षात आल्यानंतर गांधीजींच्या निसर्गोपचार तत्त्वांचा शोध घेत गेलो आणि त्यातून ‘गांधी द हीलर’ या लघुपटाची निर्मिती झाल्याचे ‘फि टनेस गुरु’ मिकी मेहतांनी सांगितले.
बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा, आमिर खानसारख्या कलाकारांना ‘फिटनेस’चे ट्रेनिंग देणाऱ्या मिकी मेहता यांनी आपल्याला गांधीजींच्या जीवनशैलीतून निरामय आरोग्याची किल्ली सापडल्याचे सांगितले. मुळात शरीर आणि मन दोन्ही तंदुरूस्त असले पाहिजेत, तरच आपण निरोगी राहू शकतो. त्यासाठी गांधीजींनी कोणत्याही औषधांविना उपाय सुचवले आहेत. गांधीजींचा निसर्गानियमांवर विश्वास होता.
कमी प्रमाणात खाणे, खाण्यात कच्च्या भाज्या आणि फळांवर असलेला भर, पोट शुध्द ठेवणे या गोष्टी त्यांच्या नेहमीच्या जीवनात महत्वाच्या होत्या. त्या का महत्वाच्या होत्या? साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वामागचा त्यांचा हेतू काय? हे अभ्यासल्यानंतर आपल्याला कित्येक गोष्टी नव्याने कळल्याचे मिकी मेहता यांनी सांगितले. सत्याग्रहाच्या आणि लोकांचे दु:ख दूर कसे करता येईल, या विचाराने झपाटलेल्या गांधीजींनी निसर्गाचा अभ्यास केला होता आणि त्यातून त्यांनी अनेक नैसर्गिक उपचारपध्दती शोधून काढल्या होत्या, अशी माहिती मेहता यांनी दिली.
सूर्य मावळत जातो तेव्हा पुरेसा आहार घ्यायचा, रात्री लवकर झोपायचे, पहाटे उगवत्या सूर्याआधी उठायचे या सगळ्या गोष्टी निसर्गाच्या चक्राशी शरीराची आणि मनाची जुळवणूक करणाऱ्या आहेत. निसर्गनियमांशी जुळवणूक करून घेत आखलेली जीवनशैली, त्याला योग-ध्यानधारणा यांची जोड, चालण्यासारखा सहजसोपा व्यायाम यातून आपण निरामय आरोग्य साधू शकतो, हे गांधीजींनी आपल्या जगण्यातून दाखवून दिले होते. आजच्या काळात या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, हे लक्षात घेऊन ‘गांधी द हीलर’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
दोन भागांच्या या लघुपटात गांधी विचारांचे अभ्यासक, गांधीजींचा जवळून अभ्यास करणारे श्याम बेनेगल यांसारखे दिग्दर्शक, निसर्गोपचार आश्रमातील डॉक्टर यांच्या मुलाखतींमधून तपशील मांडण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई, केरळ, अहमदाबाद जिथे जिथे गांधींजींचे वास्तव्य होते, तिथे प्रत्यक्ष चित्रण करण्यात आले असून या लघुपटाची पहिली झलक गांधीजयंतीदिनी दाखवण्यात येणार असून जानेवारीत हा लघुपट प्रदर्शित होईल, असे मेहता यांनी सांगितले.