यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहण पर्वात त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ ताम्रपटाची भव्य पताका फडकवणार आहे.ताम्रपटाची ध्वजपताका तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून त्याच्या नक्षीकामाची जबाबदारी स्मृतिचिन्हकार सी. एल. कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, ध्वजारोहण पर्वाच्या पूर्वसंध्येला पुरोहित संघाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा ‘हायटेक’ व्हावा यासाठी प्रशासन विविध माध्यमांचा वापर करत आहे. त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने कुंभमेळ्याची जय्यत तयारी करत पर्वणी काळात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदाचे वैशिष्टय़ म्हणजे, ध्वजारोहण सोहळ्यात फडकवली जाणारी ताम्रपटाची ध्वजपताका. पर्वणी काळात कुंभमेळ्यानिमित्त देशभरातील सर्व तीर्थ, नद्या त्र्यंबकेश्वर येथे येत असल्याची आख्यायिका असल्याने त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात येणारी कापडी ध्वजपताका यंदा बदलून ताम्रपटाची करण्यात येणार आहे. ही ध्वजपताका तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याआधी कापडी ध्वजपताका होती. यंदा तीन बाय सहा आकारातील ताम्रध्वज ३१ फूट लोखंडी पाइपवर फडकणार आहे. या पताकावर सिंहारूढ गुरू, सूर्य, चंद्र, गोदावरी वाहन मगर, दशदिशा, बारा राशी यांसह ओम ऱ्हीम स्वस्तिक यांची प्रतीके असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे यांनी दिली. ध्वजपताकांसाठी दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. नाशिक येथील स्मृतिचिन्हकार सी. एल. कुलकर्णी यांच्याकडे ध्वजपताकेचे नक्षीकाम तसेच रेखाटनाचे काम देण्यात आले आहे. ध्वजपताकेच्या निर्मितीसाठी गुजरात येथील कारागीरांची मदत घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम दशनाम पंच आखाडा परिषदेचे अध्यक्ष अवधेशानंदजी यांच्या हस्ते होणार असून या वेळी जगद्गुरू शंकराचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत. ध्वजपर्वाच्या पूर्वसंध्येला म्हणजे १३ जुलै रोजी पुरोहित संघाच्या वतीने साधू-महंताच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यात गौतम, अहिल्या, गंगा आणि गाय यांची प्रतिमा असलेले चित्ररथ सहभागी होतील. तसेच राम-लक्ष्मण यांनी कश्यप ॠषींच्या सांगण्यावरून कुशावर्त येथे वडिलांचे श्राद्ध केले तो देखावा चित्ररथाच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे.

ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला शोभायात्रा

सिंहस्थ कुंभमेळ्यात उभारण्यात येणारी ध्वजपताका तयार करण्याचे काम आपल्या कुटुंबाकडे होते. माझ्या आईने १९८९, १९९१ आणि २००३ साली कापडी ध्वज घरी तयार केले. यंदा ताम्रपटाच्या ध्वजपताकाचे काम स्मृतिचिन्हकार कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आले. १४ जुलै रोजी सकाळी साडेसहा ध्वजपर्वाचा मुहूर्त असल्याने पूर्वसंध्येलाच पुरोहित संघाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येईल. त्यात त्र्यंबक नगरीची वैशिष्टय़े सांगणाऱ्या विविध गोष्टींचा प्रतीकात्मक सहभाग राहणार आहे.

–  जयंत शिखरे

(अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ)

More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flag hoisting ceremony for kumbhamela
First published on: 17-06-2015 at 02:45 IST