युतीचा धर्म पाळा, कुठेही आपल्या हातून चूक होऊ देऊ नका, संधीचे सोने करा, नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघातून युतीच्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन शिवसेनेचे आमदार डॉ. दीपक
सावंत यांनी केले. या मेळाव्यानंतर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
हनुमाननगरातील प्रगती सभागृहात आयोजित शिवसेना शहर कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत आमदार आशिष जयस्वाल, सहसंपर्कप्रमुख रमेश बक्षी, गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख सतीश हरडे, शहरप्रमुख मंगेश काशीकर, सूरज गोजे, किशोर पराते, शिवसेना गटनेता शीतल घरत, सभापती मंगला गवरे, महिला शहर संघटिका सुरेखा खोब्रागडे, सुरेखा घोरपडे, युवा सेना जिल्हा प्रमुख हितेश यादव, राधेश्याम हटवार, चंदू राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम शहरातील शिवसेना पदाधिकारी व
कार्यकर्त्यांनी मित्रपक्ष भाजपबद्दल अनेक तक्रारी मांडल्या.
या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचे काम करण्याचे आदेश दिल्याचे सांगून उद्यापासून भाजपासोबत विधानसभा क्षेत्रनिहाय समन्वय समित्या स्थापन करून कामाला लागण्याचे निर्देश डॉ. सावंत यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. यावेळी शेखर सावरबांधे, रमेश बक्षी, सतीश हरडे यांनीही विचार मांडले.