केंद्रीय अन्न व औषध भेसळ तपास प्रयोगशाळा नागपुरात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या एका शिष्टमंडळाला दिली.
नागपुरातील केंद्रीय भेसळ तपासणी शाळा पुणे येथे हलवल्याने विदर्भातील अकराही जिल्ह्य़ातील अन्न व औषध भेसळीचे नमुने तेथे पाठवले जातात. वेळ आणि कारवाईचे गांभीर्य त्यामुळे प्रभावित होते. तेव्हा नागपुरात पूर्वापार असलेली प्रयोगशाळा परत आणावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, पुणे येथे हलवलेली तपासणी शाळा नागपुरात आणण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
मुख्यमंत्र्यांना रामगिरी येथे भेटलेल्या शिष्टमंडळात विदर्भ प्रांताध्यक्ष गजानन पांडे, सचिव संजय धर्माधिकारी, प्रांत प्रसिद्धी प्रमुख गणेश शिरोळे, सतीश शर्मा, अशोक पात्रीकर यांचा समावेश होता. मंजूर झालेली औष्णिक केंद्रे विदर्भावर लादली जातात. त्यामुळे गावेच्या गावे उद्ध्वस्त होत आहे. त्या विजेचा तुलनात्मक फायदाही विदर्भाला मिळत नाही. सर्व वीज बाहेर जाते. पर्यावरण संतुलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखील या परिसरात जलविद्युत, पवन ऊर्जा प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर द्यायला हवा, या मुद्यांकडेही पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. यावर यापुढे विदर्भात महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र स्थापन केले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.