महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश या तीन राज्यांतील वनाधिकाऱ्यांना वाघांची मोजणी कशी करायची, याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण कान्हा व्याघ्र प्रकल्पात दिले जात आहे. तीन दिवसाच्या या प्रशिक्षण शिबिरात राज्यातील मेळघाट, ताडोबा, सहय़ाद्री व पेंच या चार व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक, उपवनसंरक्षक व सहायक उपवनसंरक्षक सहभागी झाले आहेत. देशातील ३९ व्याघ्र प्रकल्पात नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या व्याघ्रगणनेची ही पूर्वतयारी आहे.
देशभरातील व्याघ्र प्रकल्पात दर चार वर्षांंनी होणाऱ्या व्याघ्रगणनेला यंदा नोव्हेंबरमध्ये सुरुवात होत आहे. देशातील सर्व ३९ व्याघ्र प्रकल्पात ट्रान्झिट लाइनच्या माध्यमातून ही गणना केली जाणार आहे. या गणनेचा हा कार्यक्रम राबविताना त्यात काही मोठे फेरबदल करण्यात आले आहे. त्याची तांत्रिक माहिती वनाधिकाऱ्यांना व्हावी, तसेच या वर्षीच्या व्याघ्रगणनेत कोणकोणते बदल केले आहेत, याची माहिती देण्यासाठी म्हणून मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश या तीन राज्यांतील वनाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्रातील ताडोबा, मेळघाट, पेंच व सहय़ाद्री या चार व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, उपवनसंरक्षक व सहायक उपवनसंरक्षक सहभागी झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक माडघुशी, सहायक उपवनसंरक्षक राजीव पवार, ताडोबा बफरचे कांचन पवार व कोअरचे सहायक उपवनसंरक्षक रेड्डी सहभागी झाले आहेत. हे प्रशिक्षण संगणक व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, तसेच प्रत्यक्ष फिल्डवरही  दिले जाणार आहे.
वाघांची मोजणी कशी करायची, असा एक कार्यक्रमच केंद्रीय वनखात्याने तयार केलेला आहे. त्यानुसार संपूर्ण रूपरेषा तयार करण्यात आली असून तीन दिवसाच्या या शिबिरात दोन दिवस कान्हाच्या जंगलात ट्रान्झिट लाइन टाकून प्रत्यक्ष घटनास्थळावर प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने दिली. या वर्षी प्रथमच एका बीटला एक ट्रान्झिट लाइन टाकण्यात येणार आहे. यात ए व बी असे दोन ट्रान्झेट टाकले जाणार आहे. वाघांच्या मोजणीसोबतच कॅमेरा ट्रॅपिंग व गणना कार्यक्रमांतर्गत वाघांच्या हालचालींवर कशा पद्धतीने लक्ष ठेवायचे, याचीही माहिती देण्यात आली. देशभरातील वाघांचे तज्ज्ञ व अभ्यासक या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. यासोबतच व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे क्षेत्र, त्या क्षेत्रातील वाघांचा वावर व गणना कार्यक्रमाच्या वेळी घ्यावयाची दक्षता व काळजी याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर यंदा हा गणना कार्यक्रम होत असल्याने राज्यातील वनाधिकारी कुठल्याही माहितीपासून वंचित राहू नये म्हणूनच हे शिबीर होत असल्याची माहिती वनखात्याच्या वतीने देण्यात आली. एका व्याघ्र प्रकल्पातील सात अधिकाऱ्यांना या प्रशिक्षण शिबिरात सामावून घेण्यात आले असून महाराष्ट्रातील चार व्याघ्र प्रकल्पातील २८ वनाधिकारी यात सहभागी झाले आहेत. कान्हा येथून प्रशिक्षण घेऊन आलेले हेच वनाधिकारी राज्यातील चारही व्याघ्र प्रकल्पात स्थानिक वनाधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व इतरांना ऑक्टोबरमध्ये प्रशिक्षण देणार आहेत. असा हा केंद्रीय वनमंत्रालयाचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. स्थानिक वनाधिकाऱ्यांसाठी ताडोबात ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवडय़ात शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.