सैन्यदलातील जवान हे सेवानिवृत्त झाले तरी ते जवानच आहेत. त्यामुळे त्यांना समाजात चांगली वागणूक मिळालीच पाहिजे. त्यांची ताकद मोठी आहे. मात्र, ते विखुरलेल्या स्थितीत असल्याने त्यांची ताकद कळून येत नाही. सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक एकत्र आल्यास त्यांचा एक दबदबा निर्माण होईल. त्यामुळे शासकीय आणि खासगी कोणतेही काम सहज होऊन जाईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर भानुदास झरे यांनी सांगितले.
विजय दिवस समारोहानिमित्त आयोजित माजी सैनिकांच्या संमेलनात ते बोलत होते. विजय दिवस समारोह समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील, कर्नल एम. डी. कुलकर्णी, कर्नल शुक्ला यांची उपस्थिती होती. संमेलनात लष्करातील निवृत्त हवालदार गोविंदराव चव्हाण, वसंतराव जाधव, सुभेदार गंगाराम रसाळ, श्रीमती कमल चव्हाण, श्रीमती कुसुम जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
भानुदास झरे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर माजी सैनिक आहेत. त्यांनी आपल्या भल्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आज कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले तर त्यांना सन्मानाची वागणूक मिळतेच असे नाही. त्यामुळे माजी सैनिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने माजी सैनिकांसाठी विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत. त्याचाही लाभ प्रत्येक माजी सैनिकाला मिळाला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. माजी सैनिकांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
संभाजीराव पाटील म्हणाले की, सातारा जिल्ह्याला इतिहास आहे. इथल्या गावागावातील जवान सैन्यदलात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील फौजमध्ये असणाऱ्यांची आणि माजी सैनिकांचीही संख्या मोठी आहे. विजय दिवसाच्या निमित्ताने माजी सैनिकांना एकत्र बोलावून त्यांचा सत्कार करावा, त्यांचे विचार, त्यांनी केलेली कामगिरी तरूणांना, जवानांना ऐकायला मिळावी या हेतूने दरवर्षी माजी सैनिकांचे संमेलन घेण्यात येते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे ही अभिमानाची बाब आहे. प्रास्ताविक बी. सी. ठोके यांनी केले.