महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेले गडदुर्ग सध्या विपन्न अवस्थेत असून अनेक किल्ल्यांना अवकळा प्राप्त झाली आहे. मात्र याही परिस्थितीत किल्ल्यांचा वैभवशाली वारसा जपण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील विविध दुर्गप्रेमी संस्था करत आहेत. विविध  सण-उत्सव किल्ल्यांवर साजरे करून त्या किल्ल्यांच्या इतिहासाला पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न या संस्थांच्या माध्यमातून होत आहे. दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने एरवी अंधारात असलेल्या किल्ल्यांवर प्रकाशाची उधळण करण्याचा अनोखा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला असून ही चळवळ आता व्यापक रूप घेत आहे. यंदा गडवाटा संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमधील शिवस्मारकांसमोर शिव-दीपोत्सव साजरा करण्यात आला तर दुर्गवीर संस्थेच्या वतीने कुंभाघाट परिसरातील आदिवासी पाडय़ांवर गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करून त्यांची दिवाळी आनंदमय करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
किल्ल्यांच्या रक्षणासाठी शहरी भागातील तरुणांनी विविध प्रयत्न सुरू केले असले तरी त्यांचे प्रयत्न मर्यादित असतात. त्यांच्या या प्रयत्नांना मोलाची मदत मिळते ती किल्ल्याच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांची. किल्ल्यावर आलेल्या दुर्गप्रेमींना गडाची ओळख करून देऊन त्यांचा पाहुणचार करण्यापर्यंतच्या सगळ्या जबाबदाऱ्या येथील गावकरी पार पाडत असतात. गावकऱ्यांच्या या पाहुणचाराची परतफेड करण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने यंदाची दिवाळी आदिवासी पाडय़ावर साजरी करण्याचे ठरले होते. माणगाव जवळच्या कुंभाघाट परिसरातील आदिवासी पाडय़ामध्ये ही दिवाळी साजरी करण्यात आली. स्थानिक आदिवासींना एकत्र करून त्यांना भेटवस्तू आणि फराळाचे वाटप करण्यात आले. माऊंटेन स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी अ‍ॅडव्हेंचर हब या संस्थेचे नंदू चव्हाण यांच्या प्रयत्नाने मदतीने दुर्गवीर प्रतिष्ठानने ५० आदिवासी कुटुंबांना जेवणासाठी लागणारे ताट, वाटी, पेला अशा वस्तूंचे वाटप केले. दुर्गवीर प्रतिष्ठानची ही दिवाळी भेट या आदिवासी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद देणारी ठरली, अशी प्रतिक्रिया संस्थेचे संतोष हसुरकर यांनी दिली.याच कालावधीमध्ये गडवाटा संस्थेने शिव-दीपोत्सवाच्या माध्यमातून किल्ल्यांच्या परिसरातील दिवाळी साजरी केली. मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सोलापूर आदी २० जिल्ह्यांमधील प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी  शिव-दीपोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर स्वच्छता करून रांगोळ्यांच्या पायघडय़ा अंथरून दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी शंभराहून अधिक दिवे लावण्याचा संकल्प या तरुणांनी केला होता. सोशल नेटवìकगच्या माध्यमातून एकत्र आलेल्या तरुणांनी गडवाट या संस्थेची स्थापना केली असून गेल्या तीन वर्षांपासून ही संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहे. घराघरांमध्ये दिवाळी साजरी करताना स्वराज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपतींचे स्मरण करण्यासाठी संस्थेने हा उपक्रम हाती घेतल्याचे संस्थेचे आबासाहेब कापसे यांनी सांगितले. दुर्गसंवर्धनासाठी असे उपक्रम राबवले जात असून त्याची एक व्यापक चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे. अन्य देशांमध्ये छोटासा इतिहास ही अत्यंत कौतुकाने आणि तितकाच गांभीर्याने जपला जात असताना आपल्याकडे मात्र हे प्रयत्न कमी पडतात. उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या तरुणांना या माध्यमातून विधायक कार्याकडे वळवून आपला इतिहास जपण्यासाठी प्रयत्न करता येतात. त्यामुळे अशा उपक्रमात तरुणांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याची गरज आहे, असे आवाहन दुर्गप्रेमी महेश कोयंडे यांनी केले.