विक्रीच्या हेतूने शस्त्रास्त्रे बेकायदा जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी मनमाड-येवला रस्त्यालगतच्या एका हॉटेलमध्ये चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे २२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली.
येवला शहराच्या हद्दीत चार युवकांकडे शस्त्रे आहेत. ही शस्त्रास्त्रे ते विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कडासने व मनमाड विभागाचे उपअधीक्षक समाधान पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला होता. या सापळ्यात मनमाड-येवला रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बसलेले विशाल चित्ते, संतोष गायकवाड, नितीन सातभाई, उमेश जगताप (सर्वाचे वय २२) हे येवला येथील संशयित सापडले. या चौघांकडे हत्यार बाळगण्याचा परवाना नसताना एक पिस्तोल आणि चार जिवंत काडतुसे मिळून आली. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही शस्त्रे या संशयितांनी कुठून आणली, कोणाला देणार होते याची चौकशी सुरू असल्याचे कडासने यांनी सांगितले.