कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. या आघाडीचा धर्म पाळण्यासाठी स्थायी समिती सभापतिपदाची खांडोळी नाईलाजाने करावी लागत आहे. राजेश लाटकर यांनी सहा महिन्यात अनेक चांगल्या योजना राबविल्या असून शिस्तबध्द सैनिक म्हणून ते आपले राजीनाम्याचे कर्तव्य पार पाडतील, असे पत्रक कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.    
मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे की, नागरिकांच्या, उद्योगपतींच्या सहकार्याने विकासाची कामे करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाइनने पिण्याच्या पाण्याच्या योजनेला त्यांच्या काळातच गती मिळाली. त्यांना आणखी अवधी मिळाला असता तर त्यांनी सर्वोत्तम शहराच्या विकासाच्या योजनेची अंमलबजावणी केली असती. परंतु आघाडीचे राजकारण करताना आम्हा नेते मंडळींच्या मनामध्ये पदाची खांडोळी करू नये असे वाटत असले तरी ती आमची अपरिहार्यता व नाईलाज असतो. लाटकरांची अपुरी कामे नवीन सभापती रमेश पोवार हे पूर्ण करतील, असा विश्वासही मुश्रीफ यांनी पत्रकात व्यक्त केला आहे.    
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता महापालिकेत आल्यानंतर मी आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आरक्षणे उठविली नाहीत. तसेच पाकीट संस्कृतीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे, असेही या पत्रकात मुश्रीफ यांनी म्हटले आहे.