महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम गेल्या वर्षांपासून जिल्ह्य़ातील, भंडारा, तुमसर व मोहाडी या तीन तालुक्यात लोकसहभागातून राबवायचा होता. जनजागृती अभियान घेणे, त्याकरिता महत्त्वाचे होते. या कार्यक्रमाची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृ षी अधिकारी यांच्यावर होती, परंतु त्यांनी काहीच न केल्याने, तीनही तालुके उपेक्षित राहिले.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या प्रगतीचा वेग वाढावा, जनमानसात ही कामे रूढ व्हावीत, यासाठी राज्य सरकारतर्फे  २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर, असे ११ दिवस जनजागृती अभियान राबविण्याचे निर्देश सर्व जिल्ह्य़ांना दिले होते. २६ नोव्हेंबर १९४९ ला भारताने राज्य घटना स्वीकारली आणि ६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. पाणलोट क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान विचारात घेऊन या जनजागृती अभियानाची रचना करण्यात आली आहे.
अधिकाधिक शेतजमीन ओलिताखाली यावी, गावातील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी राज्यातील ६२३८ ग्रामपंचायतींमधील ७८८० गावांमध्ये हा कार्यक्रम गेल्या वर्षांपासून राबविला जात आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हे प्रकल्पाचे सदस्य सचिव, तसेच प्रकल्प व्यवस्थापक असतात. या कार्यक्रमाच्या अंतर्गत मृदसंधारण, पाण्याचे व्यवस्थापन, शेततळी, सिमेंट व माती बंधारे बांधणे, पडित जमिनीत बांध तयार करणे, बांध्यांचे धुरे मोठे करणे व वृक्षलागवड इत्यादी कामे अपेक्षित आहेत.
या जनजागृती आभियानात जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर दिंडी, निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, शिबीर-मेळावे घ्यावेत, असे शासनाचे आदेश होते. शिवाय, वर्तमानपत्रातून कार्यक्रमाबाबत बातम्या, जाहिराती याव्यात, अशी अपेक्षा होती.  बॅनर्स, होर्डिंग लावण्याची मुभा दिली गेली होती.  इतके सारे पर्याय देऊनही जिल्हा बांधकाम कृषी अधिकारी कार्यालयाने एकही काम केलेले नाही. या अभियानाच्या कार्यवाहीत जिल्ह्य़ाचे पालकमंत्री  जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी हे विकास प्रक्रियेतील घटक आहेत. त्यांनी वर्षभरात एक ही कार्यक्र म राबविला नाही. जिल्हा कृषी अधीक्षक पोटे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी आर. बी. चलवदे रुजू झाले आहेत.
या अभियानाचा गेल्या वर्षांत झालेला फज्जा त्यांना अवगत आहे. नवीन वर्षांच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या घडी-पत्रिकेचे प्रकाशन २६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी सच्चिन्द्र सिंह यांनी केले होते.
या प्रसंगी पाणलोट व्यवस्थापनाचे फायदे व पाण्याच्या नियोजनवर भाषणेही झाली होती. मागील वर्षीही असाच कार्यक्र म झाला होता. चुकीची दुरुस्ती होईल की पुन्हा फज्जाच उडेल, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.