राज्यातील दोन हजार १०५ साधन व्यक्ती तथा विषयतज्ज्ञ यांच्या वेतनाचे अंदाजपत्रक केंद्र शासनाकडून मंजूर झाल्याने सर्वशिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या या पदांवरील व्यक्तींनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात केवळ एक हजार १३ पदांनाच मंजुरी दिल्याने एक एप्रिल २०१३ पासून जवळपास दोन हजार १०५ साधन व्यक्ती तथा विषयतज्ज्ञ यांच्या सेवा संपुष्टात आल्या होत्या. त्यामुळे तणावाखाली असलेल्या साधन व्यक्तींनी सर्वशिक्षा अभियान साधन व्यक्ती तथा विषयतज्ज्ञ प्रदेश महासंघाच्या माध्यमातून केंद्र शासन व राज्य शासनातील उच्चपदस्थ अधिकारी व मंत्री, नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. राज्यातील सर्वच पदांसाठी निधी मंजूर करावा या मागणीसाठी आंदोलनही केले होते. विषयतज्ज्ञ प्रदेश महासंघाचे अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्यासह शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याशी चर्चा केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत या विषयावर चर्चा घडवून आणली होती. महाराष्ट्रात २००५-०६ पासून सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद व महापालिकेत जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून करार पद्धतीने २१०५ व्यक्ती कार्यरत होत्या. या कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी केंद्र सरकारकडून निधी मंजूर होत असे. परंतु २०१३-१४ या वर्षांसाठी केवळ १०१३ पदांनाच मंजुरी मिळाली. आता मात्र वेतन मंजुरीचा प्रश्न निकाली निघाला अशी माहिती किशोर सोनवणे यांनी दिली.