शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गांधीसागरात गेल्या काही वर्षांपासून आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून ‘आत्महत्यांचे केंद्र’ अशी नवी ओळख बनू पाहत आहे. गांधीसागराचे सौंदर्यीकरण सोडाच आत्महत्या रोखण्यासाठीही महापालिका वा प्रशासनाकरवी कुठलेच प्रयत्न होत नसून प्रशासनाच्या या अनास्थेपायी ऐतिहासिक शहराचे महत्त्व पुसण्याची भीती निर्माण झाली आहे.
आजचा गांधीसागर म्हणजे ब्रिटीश व भोसल्यांच्या काळातील शुक्रवार तलाव हा शहराच्या सीमेवर होता. त्यातून कालव्यांद्वारे घरोघरी चोवीस तास पाणी पुरविले जायचे. पश्चिम काठावरील टेकडी गणेश मंदिरात नावेद्वारे राजे रघुजी भोसले कुटुंबासह जात. निसर्गरम्य तसेच पाणीसाठय़ामुळे एकेकाळी शहराचे वैभव असलेल्या शुक्रवार तलावाभोवती इमारती उभ्या झाल्या. परिसरातील टाकाऊ पाणी गांधीसागरात जमा होते. गणेश व देवी मूर्तीचे विसर्जन गांधीसागरात केले जाते. गांधीसागरात एकाच दिवशी पाचहून अधिक मृतदेह सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१२ मध्ये ६५, २०१३ मध्ये ७५ व यंदा ५० आत्महत्या झाल्याचे पोलीस सांगतात. प्रत्यक्षात तेथे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अगदी सहजरित्या येथे कुणीही आत्महत्या करू शकतो.
पाच वर्षांपूर्वी तलावाभोवती महापालिकेने खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले होते. पाण्यात लोखंडी जाळ्या लावल्या होत्या. आता रक्षकही नाहीत आणि या जाळ्याही नाहिशा झाल्या आहेत. चोवीस तास सुरक्षा रक्षक ठेवावे, यांत्रिक बोट ठेवावी, पाण्यात लोखंडी जाळ्या बसवाव्यात, चौफेर उंच जाळ्या बसवाव्यात, आदी मागण्यांचे काय झाले, ते महापालिकाच जाणो. आत्महत्याचे वाढते प्रमाण थांबविण्याची जबाबदारी प्रशासन व समाजातील प्रत्येक घटकाची आहे. मृतदेह सापडला तरच पोलीस तेथे पोहोचतात. आत्महत्या रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन कुठलेच प्रयत्न करीत नाही.
गांधीसागरात वाढत्या आत्महत्या दुर्दैवी असल्याचे सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी मान्य केले. आत्महत्यांचे प्रमाण रोखण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकांची आहे. त्यासाठी शक्य तेवढी गस्त व आणखी काय करता येईल, यासंबंधी नागरिकांशी चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले. चोवीस तास शक्य नसले तरी वेळ काढून नागरिकांच्या मदतीने पोलिसांचेही गांधीसागरावर लक्ष असते, असे गणेशपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर नंदनवार व सहायक निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी सांगितले.
गुजरातच्या अहमदाबादमधील कांकरिया तलावात आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते. मात्र, तेथील महापालिकेने पुढाकार घेतल्याने त्यावर आळा बसला. त्या तलावाचे सौंदर्यीकरण केल्याने ते आता जागतिक पर्यटनस्थळ बनले आहे. गांधीसागरावर जगदीश खरे व त्यांच्या पत्नीच्या प्रयत्नाने आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. अनेक मृतदेहही त्यांनी काढून दिले आहेत. ते खऱ्या अर्थाने मित्र असल्याचे पोलीस सांगतात.