प्रसाद करताना जागा स्वच्छ व आरोग्यदायी ठेवा..कच्चा माल नोंदणीकृत अन्न व्यवसायिकांकडून खरेदी करा..खराब फळांचा वापर करून नका..प्रसाद वाटप करणाऱ्या स्वयंसेवकांनी स्वच्छ वस्त्र, हातमोजे, आणि डोके झाका आणि त्यानंतर प्रसाद वाटप करा..खवा माव्याचे पदार्थाची अतिदक्षता घ्या, अशा स्वरूपाची आचारसंहिता यंदा राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांना आखून दिली आहे. यासंबंधीचे नियम यापूर्वीच अस्तित्वात आले असले तरी अन्न, औषध प्रशासनाने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात या आचारसिहतेची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या नियमांची अंमलबजावणी करताना गणेशोत्सव मंडळांना घाम फुटण्याची शक्यता आहे.
धार्मिक सण उत्सवांमध्ये प्रसादाला विशेष महत्त्व असून प्रसादाच्या सेवनामुळे होणाऱ्या लाभाच्या अनेक कथा प्रचलित आहेत. तर अनेक वेळा जुन्या, शिळ्या प्रसादाच्या सेवनामुळे मानवी आरोग्याला अपाय झाल्याच्या घटनाही तितक्याच ठसठशीतपणे समोर येतात. यावर उपाय म्हणून ‘अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६’ या नियम आणि नियमनाची तरतूद करण्यात आली असून २०११ मध्ये तो लागू करण्यात आला होता. या अधिनियमाची आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारे कार्यवाही झाली नसल्याने यंदाच्या गणेशोत्सवात हे नियम पाळले जावेत, असा आग्रह राज्य सरकारने धरला आहे. गणेशोत्सव मंडळे, सार्वजनिक देवस्थाने, प्रसाद वाटप होणारी विविध ठिकाणे आणि खासगी घरातील महाप्रसाद वाटपावर या नियमावलीमुळे नियंत्रण राहणार असून यामुळे अस्वच्छतेला नियंत्रणात राखण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मोठी मंडळे, मिठाई व्यापाऱ्यांना माहिती देणार..
ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारीत ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट, नेरूळ आणि ऐरोली अशा दहा भागांमध्ये अन्न सुरक्षा सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून मोठी मंडळे, मिठाई व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन या नियमांची माहिती देण्यात येणार असून त्यानुसार त्यांच्याकडून कायद्याचे पालन करून घेतले जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे कोकण विभागाचे सहआयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली. मंडळांनी अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाऊन याकरिता नोंदणीसुद्धा करता येणार असून त्यानुसार प्रत्येक मंडळाला वर्षभराचा परवाना दिला जाणार आहे. या परवान्यासाठी मंडळाला केवळ १०० रुपयांचे शुल्क देणे बंधनकारक असणार आहे. या नोंदणीमुळे अन्न सुरक्षेविषयी इत्थंभूत माहिती मंडळांना देण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. यंदा कारवाई सुरु करण्यात आली असली तरी सुरुवातीला अशा मंडळांना प्रथम नोंदणीसाठी उद्युक्त करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वच्छ प्रसादासाठीची नियमावली…
* प्रसाद निर्मिती करत असलेली जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी
* प्रसादासाठी लागणारा कच्चा माल, अन्न पदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकांकडून खरेदी करावा.
* प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकणे असलेली असावी.
* फळांचा प्रसाद करताना परवानाधारक आणि ओळखीच्या विक्रेत्यांकडून खरेदी करावा.
* सडलेले किंवा खराब फळांचा वापर करू नये.
* प्रसादाचे उत्पादन करताना ते माणसासाठी खाण्यास योग्य असल्याची खात्री करावी.
* आवश्यक तेवढय़ा प्रसादाची निर्मिती करावी.
* प्रसादासाठीचे पाणी पिण्या योग्य असावे.
* प्रसाद उत्पादन आणि वितरण करणाऱ्या स्वयंसेवकांनी स्वच्छ कपडे (अ‍ॅप्रन), हातमोजे (ग्लोव्हज), टोपी (हेड गिअर) वापरावे.
* प्रसाद वितरणाच्या प्रत्येक वेळी स्वयंसेवकांनी हात स्वच्छ धुवावेत.
* प्रसाद उत्पादन आणि वितरण करणारा स्वयंसेवक कोणत्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.
* खवा, माव्याची अधिक दक्षता घेऊन त्याची वाहतूक व साठवणूक कोल्ड स्टोरेजमध्येच
* अंश सेल्सिअस खालीच करावी.
* जुना, शिळ्या माव्याचा प्रसादासाठी वापर करू नये.
* प्रसाद बनवणाऱ्या मंडळांनी प्रसादाच्या कच्च्या मालाचे बिल, प्रसाद बनवणाऱ्या स्वयंपाकी (केटरर), स्वयंसेवक या सर्वाची माहिती व्यवस्थित साठवून ठेवावी.
* अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना जबाबदार व्यक्तीने माहिती द्यावी.