आली गौराई अंगणी..!

कुठे गोडाचा, तर कुठे भाजी-भाकरीचा तर कुठे परंपरेने चालत आलेला सामिष नेवैद्य दाखवून गणरायाबरोबर माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईचे पूजन बुधवारी करण्यात येईल.

कुठे गोडाचा, तर कुठे भाजी-भाकरीचा तर कुठे परंपरेने चालत आलेला सामिष नेवैद्य दाखवून गणरायाबरोबर माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईचे पूजन बुधवारी करण्यात येईल.
महाराष्ट्रात गौराईच्या पूजनाची आणि तिच्या होणाऱ्या लाडकौतुकाची पद्धती पावलापावलावर बदलत जाते. मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटीन शहरात तर ती घरागणिक बदलते. काही ठिकाणी त्या त्या प्रांतातील पद्धतीनुसार गौरीच्या मुखवटय़ांचे पूजन केले जाते. तर काही ठिकाणी नदी किंवा समुद्रातील खडे जमा करून त्यांची पूजा केली जाते. इतकेच काय तर गौरीला दाखविल्या जाणाऱ्या नेवैद्याच्या प्रकारांमध्येही प्रांतागणिक बदल असतो.
गणपतीच्या कोडकौतुकातही या माहेरवाशिणीच्या स्वागताची जय्यत तयारी आधीपासूनच सुरू होते. गौरीचे मुखवटे तयार करणे, तिला नव्या नवरीप्रमाणे सजवणे, तिच्यासाठी सौभाग्याचे वाण तयार करणे या कामात घरातील आयाबहिणी गुंतून जातात. तिच्यासाठी नवीन साडी, दागिने, वेणी, गजरे असा सारा थाट असतो. गौराईचा सण हा माहेरवाशीणींचा समजला जातो. त्यामुळे तिच्याबरोबरच माहेरवाशीणींनाही त्या दिवशी मोठा मान असतो. काही ठिकाणी सोळा भाज्यांचा नैवेद्य गौरीला दाखविला जातो. तर काही ठिकाणी मटण आणि वडे नैवद्याच्या ताटात जागा पटकवतात.

खडय़ांच्या गौरी
आपल्याकडे प्रत्येक प्रांतागणिक गौरी पुजायच्या पद्धती बदलत जातात. डोंबिवलीतील मीरा केतकर यांच्या घरच्या पद्धतीनुसार नदी, समुद्र किंवा विहिरीजवळील एकाच आकाराचे पाच खडे धुवून पुसून स्वच्छ वस्त्रामध्ये गणपतीच्या जवळ ठेवतात. या खडय़ांचे पूजन म्हणजेच गौरीचे पूजन. मग त्यांना नैवेद्य दाखवला जातो. त्यांच्या घरी गौरीची पूजा माहेरवाशीण किंवा कुमारिका करते. गौरीला सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो.

ज्येष्ठा आणि कनिष्ठा
डोंबिवलीच्याच मधुश्री प्रताप यांच्या घरी दोन उभ्या गौरी पूजल्या जातात. यामधील एक गौरी जेष्ठा असते तर दुसरी कनिष्ठा. वरवर पाहता हा फरक दिसत नाही. पण गौरींची स्थापना आणि सजवणूक झाल्यावर मात्र त्यांच्यातील फरक दिसून येतो. एक पत्र्याच्या डब्यामध्ये गहू, करंजी, लाडू ठेवले जातात. त्याच्या बाजूला दोन पातेली ठेवून त्यामध्ये तांदूळ भरून त्यावर गौरीचे मुखवटे लावले जातात. ही पातेली म्हणजे गौरीचे पोट. त्यात धान्य भरले जाते. गौरीचे मुखवटे शाडू किंवा पितळेचे असतात. या गौरी येताना एकटय़ा न येता त्यांच्या लेकराबाळांना घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्या शेजारी मुलगा आणि मुलगीच्या स्वरूपातील दोन बाळेही ठेवली जातात. मधुश्री यांच्या घरी पडवळाची कढी, अळूची भाजी, पाच भाज्या, पाच फळे, पापड असा साग्रसंगीत नैवेद्य असतो.

पाच सुपांची ओटी
गोरेगावच्या नम्रता म्हात्रे यांच्या घरी भाज्या-फळांनी भरलेल्या पाच सुपांनी गौरीची ओटी भरण्याची पद्धत आहे. त्याला ओवसा (काही ठिकाणी ववसा) म्हटले जाते. विशेषत: नवविवाहिता पहिलावहिला सण म्हणून ही सुपे भरून घेऊन येतात. त्यामध्ये पाच प्रकारची फळे, पाच भाज्या, गहू, नारळ, काळेमणी, हिरव्या बांगडय़ा यांचा समावेश असतो. या सुपाची ओटी गौरीला भरली जाते. तर इतर स्त्रिया एकाच सुपाची ओटी भरतात. नम्रता यांच्या घरी गोड नैवेद्यासोबतच मासळी, चिकन-मटणचा नैवेद्यही दाखवला जातो. गौरीच्या पुढे पडदा लावून हा नैवेद्य दाखवला जातो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ganpati gauri festival