ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महापालिकेने गेल्या काही वर्षांत शहरातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. यामुळे अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना रुंदीकरण झालेल्या रस्त्यांवर गॅरेज व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे चित्र दिसू लागले आहे. ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ िशदे यांचे प्राबल्य असलेल्या वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर ते कामगार हॉस्पिटल या मार्गालगत गॅरेज व्यावसायिकांनी वाहनांच्या दुरुस्तीसाठी पदपथ आणि रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. या भागात महापालिकेच्या रुंदीकरण कामानंतर तीन पदरी रस्ता तयार झाला आहे. यापैकी दोन पदरी रस्ता गॅरेज व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याचे दिसून येते. त्यामुळे रुंदीकरणाच्या कामामुळे समाधानी असलेल्या प्रवाशांपुढे नवी डोकेदुखी ऊभी ठाकली आहे. विशेष म्हणजे, तत्कालीन आयुक्त आर.ए.राजीव यांनी याच भागातील गॅरेजवाल्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. राजीव यांची बदली होताच गॅरेजवाले पुन्हा मोकाट सुटले असून प्रवाशांना होणारा त्रास अतिक्रमणविरोधी पथक उघडय़ा डोळ्यांनी पाहात असल्याचे चित्र आहे.
ठाणे येथील वागळे इस्टेट भागात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती आहे. या भागातील इंदिरानगर, साठेनगर, हनुमाननगर, रामनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर, यशोधननगर, महात्मा फुलेनगर, जयभवानी नगर आदी परिसरात जाण्यासाठी नितीन कंपनी ते कामगार रुग्णालय आणि इंदिरानगर या मार्गाचा वापर नागरिक मोठय़ा प्रमाणात करतात. हा अंतर्गत रस्ता या भागातील प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच वागळे आगारातून ठाणे स्थानक तसेच अन्य परिसरात जाणाऱ्या परिवहन सेवेच्या बसगाडय़ाही याच मार्गावरून धावत असतात. या रस्त्याचे महत्त्व ओळखून महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने रुंदीकरणाचे काम हाती घेतले. त्यानुसार या भागात सहा पदरी रस्ता तयार करण्यात आला. पूर्वी अरुंद असलेला रस्ता सहा पदरी झाल्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अभियांत्रिकी विभागाने केलेल्या कामावर अतिक्रमण विभागाच्या नाकर्तेपणामुळे बोळा फिरला आहे. या मार्गावरील गॅरेज व्यावसायिकांचे अतिक्रमण वाहतुकीसाठी अडथळे ठरू लागले आहे. रस्त्यालगत असलेल्या गाळ्यांमध्ये रिक्षा दुरुस्ती करणाऱ्या गॅरेज चालकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी येणाऱ्या रिक्षांच्या या मार्गावर अक्षरश: रांगा लागल्याचे चित्र पाहाव्यास मिळते. तसेच या भागातून टाकण्यात आलेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी हा मार्ग नेहमीच खोदण्यात येत असल्याचे दिसून येते. या कामासाठी या मार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात येते. त्यामुळे गॅरेजवाल्यांचे फावले आहे. खोदकामासाठी रस्ता बंद करताच बंद रस्त्यावर गॅरेजचालक बिनधोकपणे आपला संसार थाटतात. त्यामुळे काम पूर्ण झाल्यावर रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत झाल्यानंतरही हे अतिक्रमण कायम रहाते, असे चित्र आहे. तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांनी या गॅरेजवाल्यांवर कारवाई केली होती. मात्र राजीव यांची बदली होताच या भागात गॅरेजवाल्यांनी पुन्हा रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. आयुक्त असीम गुप्ता यांचा अतिक्रमण विभाग मात्र याविषयी डोळ्यांवर झापड बांधून असल्याचे चित्र आहे.
गॅरेज व्यावसायिकांना रस्ते आंदण
मुंबई-नाशिक महामार्गाला छेदणाऱ्या नितीन जंक्शन येथून कामगार हॉस्पिटल मार्गे इंदिरानगपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गॅरेज व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. कामगार हॉस्पिटल ते इंदिरानगर या मार्गालगत असलेले छोटे-छोटे व्यावसायिक गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये गॅरेजवाल्यांसह वाहनांचे स्पेअर पार्ट, आइल आदीची विक्री करणारे कार्यरत आहेत. या गॅरेजवाल्यांनी रस्त्यालगतच्या पदपथासह रस्ता गिळंकृत केल्याचे चित्र अनेक वर्षांपासून पाहावयास मिळते. या अतिक्रमणामुळे या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. असे असतानाही महापालिकेचा अतिक्रमण विभाग अशा गॅरेजवाल्यांवर कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेने हा मार्ग गॅरेज व्यावायिकांसाठी आंदण दिल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.