लोणंद येथील ‘गरवा’ आता सिंगापूर ,मलेशिया, दुबई, मस्कत आदी देशांत निर्यात होत आहे. मध्यम आकाराचा आकर्षक रंगाचा चटकदार चवीचा वेगवेगळया पॅकिंगमध्ये दररोज पाच ट्रक कांदा निर्यातीसाठी पाठविला जात आहे.
या वर्षी लोणंदच्या बाजार समितीत सातारा व पुणे जिल्ह्य़ातून मोठया प्रमाणात आवक होत आहे. सध्या कांद्याला ७०० ते ८०० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. परदेशाप्रमाणेच देशी बाजारातही व राज्यातील पुणे व मुबंई बाजारातही येथून कांदा पाठविला जात आहे.मागील पंधरा दिवसांपासून येथील मार्केट मधून निर्यातीसाठी कांद्याची खरेदी करण्यात येत आहे.
निर्यातीसाठी प्रतवारी केलेला कांदा ५, १०, १२, १५, २०, २५ व २८ किलो वजनाच्या पिशव्यांचे पॅकिंग केले जात आहे. या वर्षीचा हंगाम किमान अजून दोन महिने चालेल असा अंदाज आहे. गरव्या कांद्याची आवक संपेपर्यंत कांद्याची निर्यात करण्यात येणार असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. या वर्षी निर्यात व देशांतर्गत मागणी लक्षात घेता हंगाम संपेपर्यंत भाव टिकून राहतील, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.