* ५४ कोटींची दोन नवी कंत्राटे
* जुने ठेकेदार मोडीत
* प्रस्ताव वादग्रस्त ठरण्याची चिन्हे
नवी मुंबईतील कचरा वाहतुकीचे सुमारे २०० कोटी रुपयांचे कंत्राट यापूर्वीच वादात सापडले असताना नवी मुंबई महापालिकेने शहरातील कचरा तसेच लहान नाल्यांच्या सफाईसाठी ५४ कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव आखला असून यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहर, गावठाण तसेच झोपडपट्टय़ांमधील सफाईची कामे यापूर्वी ८१ कंत्राटदारांमार्फत करण्यात येत होती. महापालिकेच्या स्थापनेपासून सुरू असलेली ही पद्धत मोडीत काढून यापुढे अवघ्या दोन कंत्राटदारांमार्फत ही कामे करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला असून यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीविरोधात विरोधी पक्ष पुन्हा एकदा एकवटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केला जात असून साफसफाईच्या काही कंत्राटांमुळे महापालिकेची एकूण कार्यपद्धती वादात सापडली आहे. शहरातील कचरा वाहतुकीचे सुमारे २३० कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर करून काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा वाद ओढवून घेतला आहे. याशिवाय ठाणे-बेलापूर तसेच पाम बीच मार्गावरील सफाईची कामे यांत्रिकी पद्धतीने करण्याचे कंत्राटही वादात सापडले आहे. आयुक्त भास्कर वानखेडे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेले हे दोन प्रस्ताव प्रशासनासाठी अडचणीचे ठरू लागले असतानाच अंतर्गत साफसफाईची जुनी पद्धत मोडीत काढून नव्याने आखलेल्या दोन कंत्राटांमुळे वानखेडे पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील साफसफाईच्या सुमारे १५ कोटी रुपयांच्या ठेक्याला कोणत्याही निविदाप्रक्रियेशिवाय मुदतवाढ देण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी यापूर्वीच मंजूर करून घेतला आहे. सफाईसंबंधीची ही सर्व कंत्राटे वादात सापडली असताना जुन्या ८१ ठेकेदारांना रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्त वानखेडे यांनी सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे.
नवी मुंबई परिसरातील दैनंदिन सफाई तसेच पावसाळ्यापूर्वीच्या लहान गटारांची सफाई ८१ ठेकेदारांमार्फत केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही कामे केली जात असून यापैकी ७१ ठेकेदार हे प्रकल्पग्रस्त कुटुबांतील आहेत. साफसफाई करणाऱ्या या ठेकेदारांची मुदत केव्हाच संपली आहे. मात्र, महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून या ठेकेदारांना सातत्याने मुदतवाढ देऊ केली आहे. २००६ मध्ये मंजूर झालेल्या दरांनुसार हे ठेकेदार कामे करत आहेत. ८१ गटांमध्ये सफाईची कामे दिली जात असल्याने एका ठेकेदारावर शहरातील साफसफाई अवलंबून नाही. त्यामुळे ही व्यवस्था फारशी कोलमडल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांत दिसलेले नाही. असे असताना ऐरोली ते वाशी आणि वाशी ते बेलापूर अशा दोन परिमंडळात साफसफाईची दोन कंत्राटे काढण्याचा प्रस्ताव वानखेडे यांच्या प्रशासनाने ठेवला असून यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवी मुंबईतील एका बडय़ा राजकीय नेत्याच्या मर्जीतील व्यक्तीला हा ठेका देण्यासाठी जुनी पद्धत मोडीत काढून दोन ठेके तयार केले जात असल्याचा आरोप होऊ लागला असून येत्या काळात यावरून महापालिकेत नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नवी मुंबईतील कचरा सफाई आता बडय़ा ठेकेदारांच्या हवाली
* ५४ कोटींची दोन नवी कंत्राटे * जुने ठेकेदार मोडीत * प्रस्ताव वादग्रस्त ठरण्याची चिन्हे नवी मुंबईतील कचरा वाहतुकीचे सुमारे २०० कोटी रुपयांचे कंत्राट यापूर्वीच वादात सापडले असताना नवी मुंबई महापालिकेने शहरातील कचरा तसेच लहान नाल्यांच्या सफाईसाठी ५४ कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव आखला असून यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
First published on: 07-02-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage cleaning in new mumbai contract is in hand of big contractor