scorecardresearch

कचरा उचलणारी रेल्वेगाडी!

मध्यरात्री साडेबारानंतरची वेळ.. पहाटे चारपासून सुरू झालेली उपनगरीय रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुस्तावलेली..

कचरा उचलणारी रेल्वेगाडी!

मध्यरात्री साडेबारानंतरची वेळ.. पहाटे चारपासून सुरू झालेली उपनगरीय रेल्वेगाडय़ांची वाहतूक सुस्तावलेली.. साडेबारानंतर स्थानकांवर रेंगाळलेल्या चुकार माणसांना घेऊन शेवटची गाडी निघून गेलेली.. आता पहाटे पावणेचापर्यंत रेल्वेमार्ग शांत.. या अशाच शांततेत रेल्वेमार्गावर रेल्वेच्या अशा खास गाडय़ा बाहेर पडतात. काही ओव्हरहेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी, काही रुळांखालील खडी, स्लीपर बदलण्यासाठी, तर काही रेल्वेमार्गावर पडलेला कचरा उचलण्यासाठी! रेल्वेच्या ताफ्यात या अशा कचरा उचलणाऱ्या कचरागाडय़ा आहेत. मुंबईकरांनी रेल्वेमार्गावर टाकलेला कचरा तिथेच पडून राहू नये, यासाठी रेल्वेला तो उचलावा लागतो. मात्र तो उचलून ट्रक किंवा तत्सम वाहनाने नेण्याची सोय नसल्याने रात्रीच्या वेळी या कचरागाडय़ा रेल्वेमार्गावर चालवल्या जातात.मुंबईतील रेल्वेमार्गालगतच्या वस्तीतून तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेमार्गावर मोठय़ा प्रमाणात कचरा टाकला जातो. दर दिवशी काहीशे किलो या प्रमाणात पडणाऱ्या या कचऱ्यामुळे रेल्वेमार्गालगत अनेक समस्याही उद्भवू शकतात. या कचऱ्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या, रबरी स्लीपर, बाटल्या, जुने कपडे अशा गोष्टी असतात. त्याशिवाय रेल्वेमार्गालगत जमणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्याचाही अडथळा रेल्वेच्या वाहतुकीला होऊ शकतो. परिणामी हा मातीचा ढिगारा, कचरा, जादा खडी आदी गोष्टी वेळच्या वेळी उचलणे गरजेचे असते. त्यासाठी रेल्वेने कंत्राटे दिली आहेत. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांदरम्यानचा कचरा गोळा करण्यासाठी ही कंत्राटे देण्यात आली आहेत.हा कचरा गोळा करण्यासाठी कंत्राटदाराच्या हाताखालील माणसे २० किंवा ४० च्या गटाने दोन स्थानकांलगत कामे करतात. हा कचरा खुरपणीने गोळा करून तो पोत्यांमध्ये भरला जातो. ही पोती एकावर एक रचून रेल्वेमार्गालगत ठेवली जातात. दिवसाढवळ्या उपनगरीय रेल्वे वाहतूक चालू असताना हे काम करणे जिकिरीचे असते. मात्र रेल्वेमार्ग स्वच्छ राहावा, यासाठी ही माणसे कामे करत असतात. अशा पद्धतीने दर दिवशी रेल्वेमार्गालगत दोन ते अडीच हजार पोती कचरा भरला जातो.रेल्वेमार्गालगत एकत्र केलेला हा कचरा रेल्वेच्या कचरा गाडीत टाकण्यासाठी रात्री विशेष ब्लॉक घेतला जातो. उपनगरीय रेल्वेमार्गावरील वाहतूक थांबल्यानंतर कुर्ला किंवा सानपाडा कारशेडमध्ये उभ्या असलेल्या या कचरागाडय़ा रेल्वेमार्गावर आणल्या जातात. त्यासाठी आठवडय़ातील एक दिवस निश्चित केला जातो. दर दिवशी दोन-अडीच हजार पोती, या हिशोबाने आठवडाभरात दहा ते १२ हजार पोती कचरा या गाडीत भरायचा असतो.त्यासाठी रेल्वेमार्गालगत पोती गोळा केलेल्या ठिकाणी कंत्राटदाराची माणसे उभी असतात. रात्रीच्या वेळी गाडीत कचरा भरण्यासाठी पुन्हा २० ते ४० माणसांचा गट असतो. ही पोती सहा डब्यांच्या गाडीत भरण्यासाठी कामगारांकडे फक्त दोन ते अडीच तास एवढाच वेळ असतो. या कामगारांना दर दिवसाचे २०० रुपये याप्रमाणे मेहनताना दिला जातो.पोती गाडीत भरल्यानंतर त्या रात्री ती गाडी पुन्हा कारशेडमध्ये जाते. गाडी रिकामी करण्यासाठी पुन्हा रात्री विशेष ब्लॉक घेतला जातो. पोती रिकामी करण्यासाठी कंत्राटदाराचे १२ ते १५ कामगार या गाडीत चढतात. गाडी वाशी-कळवा-कोपर अशा खाडीलगतच्या सखल भागांजवळ आणली जाते. हे कामगार पुढील दीड तासात पुन्हा गाडीतील पोती या सखल भागात टाकतात आणि रिकामी गाडी पुन्हा कारखान्याकडे रवाना होते.हा प्रकार आठवडय़ातील सातही दिवस चालू असतो. आठवडाभर कंत्राटदाराची माणसे वेगवेगळ्या स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गावर कचरा गोळा करत असतात. रात्रीच्या वेळी ती पोती गाडीत भरत असतात, एका रात्री सगळी पोती सखल भागात टाकत असतात. रात्रीच्या वेळी हे काम झाल्यावर थकलेभागले कामगार घरी परततात.पहिली गाडी मुंबईच्या दिशेने निघते.. गाडीत खिडकीत बसलेला प्रवासी वेफर्सच्या पाकिटातला शेवटचा वेफर तोंडात टाकून पिशवी खिडकीबाहेर फेकतो आणि मान रेलून झोपी जातो.. वाऱ्याच्या झोताने ती पिशवी उडून रेल्वेमार्गालगत स्थिरावते..

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त ( Mumbaii ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-09-2015 at 04:28 IST
ताज्या बातम्या