बागेत प्रत्येक महिन्यात काही महत्त्वपूर्ण कामं करावी लागतात. आपण वेळेनुसार बागेत कामं केली की कलात्मक, वैशिष्टय़पूर्ण व आकर्षक बागेचं स्वरूप आपल्या बागेला नक्कीच येईल. हिरव्या बागेत लाल, पिवळी, गुलाबी रंगाची फुलं पाहिली की, मनाला खूप आनंद मिळतो. प्रतिकूल परिस्थितीत ही बाग सुंदर दिसावी, असं बागेचं नियोजन करावं. बागेत सुंदर झाडं लावताना त्याचं फूल आणि पान यांचे रंग कसे राहणार, याकडेही लक्ष द्यावं. कारण, रंगसंगतीनं बागेला एक विशिष्ट रूप आपण देऊ शकतो.
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात बागेत काय कामं करायची, फुलांच्या कुंडय़ांनीही बाग सजावट कशी करायची, ते पाहू या. नोव्हेंबर महिन्यात थंडी पडायला चांगलीच सुरुवात होते. त्यामुळे थंडीचा प्रभाव हा लॉनवर पडलेला दिसून येतो. लॉनवर पाणी टाकणं नोव्हेंबर महिन्यात थोडं कमी करावं. थंडीमुळे लॉन खूप वाढत नाही. लॉन हिरवेगार दिसण्यासाठी स्टेरामील खत १० फूट लॉनला १०० ग्रॅम याप्रमाणे द्यावं, लॉन हिरवेगार दिसेल. गुलाबाची नवीन झाडं बागेत लावण्यासाठी सर्वोत्तम असा नोव्हेंबरचा महिना असतो. नर्सरीतून गुलाबाचं रोप आणताना निरोगी व सशक्त असं रोप आणावं. बागेत आधीची झाडं लावली असल्यास त्याला नोव्हेंबर महिन्यात भरपूर फुलं आलेली असणार. फलोरीबंडा हा प्रकार गुलाबाची भरपूर फुलं देणारा आहे. पांढरा, गुलाबी व नारिंगी रंग आता आपल्याकडे नर्सरीतून मिळायला लागले आहेत. त्या प्रकाराला शेकडो गुलाबाची फुलं येतात. अ‍ॅकालिफाच्या पानांनाही नोव्हेंबर महिन्यात सुंदर लाल रंग आलेला असतो. शेवंतीची फुलं कुंडीत लावलेली असतील तर भरपूर सूर्यप्रकाश मिळेल, अशा ठिकाणी कुंडय़ा ठेवाव्यात.
दिवाळीत शेवंतीच्या फुलांनी सुंदर सजावट करता येतं. पूर्ण उमललेली फुलं तोडायची असल्यास कळय़ांना धक्का न लावता अलगद तोडावीत. पांढऱ्या व पिवळय़ा रंगाची फुलं आपल्या बागेची शोभा वाढवितात. डँथस व पिटोनियाची फुलांची रोपं नर्सरीतून जरूर आणा. सहा-सात महिनं विविध रंगछटांनी पिटोनीया मनाला मोडून टाकतो. या महिन्यात कुंडय़ांमध्ये फुलांनी बहरलेली ही पिटोनीयाची रोप लावावीत. बोगनवेल ही या महिन्यात बहरून आलेली असणार. जगातल्या सर्व वेलींमध्ये बोगनवेली सगळय़ात सुंदर व आकर्षक फुलांनी दर्शनीय दिसते. ही वेल झाडासारखी दिसते, पण कटिंगनं आकार देता येते. या झाडांकडे फार कमी लक्ष द्यावं लागतं. फुलांचा बहर येऊन गेला की, फूटभर कापावी, भरपूर फुलं येत असल्यामुळे मनाला खूप आनंद मिळतो. केनाची फूल ही नोव्हेंबर महिन्यात भरपूर लागलेली दिसतात. ज्या झाडांची फुलं येऊन गेलेली असतील त्यांची खालपर्यंत कटिंग करावी. टिकोमा गौरी चौरीला भरपूर पिवळी फुलं नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आलेली दिसतात. एकझोरा, मसुंडा, झेंडू, जरवेरा, डेलियाच्या फुलांनी फुललेली बाग घरांचीही शोभा वाढविते. शेवंती, डँथस, पिटोनीयाच्या फुलांच्या कुंडय़ांनी कॉर्नर सजावट चांगली करता येते. मागं एरीका पामच्या कुंडय़ा ठेवाव्यात व दिवे, समया लावून सजावट करावी. जानेवारी महिन्यात प्रदर्शनात भाग घ्यायचा असेल तर त्या दृष्टीनं कुंडय़ांची देखभाल करावी. प्राकृतिक सौंदर्य आणि फुलांच्या सुगंधाच्या प्रती आकर्षण, ही आपली स्वाभाविक प्रवृत्तीच आहे. ती नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आपल्याला आनंदाची अनुभूती देऊन जाईल.