शहरातील विविध भागातील महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत येणाऱ्या उद्यानाची देखभाल आणि त्याचे संचालन करण्याची जबाबदारी विशिष्ट खासगी संस्थांकडे देण्यात आली आहे. उन्हाळ्यात अनेक लोक कुटुंबासह उद्यानात जातात त्याचा फायदा घेत उद्यानात प्रवेश व मनोरंजन साधनावरील शुल्क वाढवून नागरिकांची लूट करण्याचे प्रकार वाढत आहे.
शहरातील अनेक उद्यानांमध्ये उन्हाळ्यात गर्दी वाढत असते. त्यात काहींचा विकास करण्यात आला नाही तर काही उद्याने विकसित केली असली तरी त्यांचे संचालन करण्याची जबाबदारी खासगी संस्थांकडे देण्यात आली आहे. शहरात धरमपेठमधील श्रीकांत जिचकार ट्रफिक पार्क, अंबाझरी उद्यान, वर्धमान नगरातील लता मंगेशकर उद्यानासह शहरातील विविध भागात असलेले उद्यान महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने विकसित केल्यानंतर त्याची देखभाल आणि संचालन करण्याची जबाबदारी काही खासगी संस्थांकडे देण्यात आली आहे. या उद्यांनामध्ये लहान मुलांसाठी विविध खेळणीसोबत अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली असून प्रत्येक गोष्टींसाठी मनमानी शुल्क आकारले जात आहे. धरमपेठेतील ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ट्राफिक पार्कचे देखभाल व संचालन करण्यासाठी पुन्हा एकदा तीन वर्षांसाठी महापालिकेने निविदा बोलवली असताना केवळ विभूती एन्टरमेंट या एकाच कंपनीची निविदा आल्याने तीन वर्षांंसाठी त्यांना कंत्राट देण्यात आले. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शुल्क आकारले जात आहे. शिवाय बाहेरच्या भागात मोठय़ा प्रमाणात खाद्य पदार्थाचे स्टॉल लावण्यात आले असून त्या ठिकाणी मनमानी शुल्क आकारले जात आहे. अनेकांनी या ट्रॅफिक पार्क समोर असलेल्या फूटपाथवर दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. मात्र, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. वर्धमाननगरातील उद्यानात अशीच स्थिती असून त्या ठिकाणी कंत्राटदाराच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अंबाझरी उद्यानाची जबाबदारी एका खासगी संस्थाकडे देण्यात आली असून त्या ठिकाणी उद्यानाच्या आत अनेकांनी दुकाने थाटली आहेत. ज्या खासगी संस्थांकडे देखभालची व्यवस्था देण्यात आली आहे. ते आपल्या मर्जीनुसार मनोरंजन संदर्भातील साधने थाटून त्याचे शुल्क किती असणार ते ठरवतात. या खासगी संस्था नगरसेवक किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संबंधीत असल्याची शंका आहे. शेगावमधील आनंद सागरचा विकास करणाऱ्या कंपनीकडे अंबाझरी उद्यानाच्या विकासासाठी सल्लागार म्हणून काम देण्यात आले. त्यांचा ‘फायनान्शियल फिजीब्लिटी रिपोर्ट’ तयार केला. मात्र, अजूनही हा प्रस्ताव केवळ कागदावर असून त्याबाबत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. महापालिकेतर्फे शहरातील ५३ उद्यानांचा विकास करण्यात येणार होता. त्यात ३३ उद्याने नवीन असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत नवीन उद्याने तर दिसत नाही. मात्र, जी आहे त्याचा विकास करण्यातही आला नाही.