शिवसेना सोडण्याच्या व काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासंबंधीच्या चर्चा पूर्णत: निराघार असल्याचे स्पष्टीकरण यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघातील सेना खासदार भावना गवळी यांनी लोकसत्ताजवळ केले आहे. मी शिवसेना कदापिही सोडणार नाही. शिवसेनेच्याच उमेदवारीवर या मतदार संघातून २०१४ ची निवडणूक लढून प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. निवडणुका तोंडावर असतांना उलटसुलट चच्रेचे पेव नेहमीच फुटत असते, असे सांगून त्या म्हणाल्या की, ज्यांची लोकप्रियता खूप असते त्यांच्याचकडे इतर राजकीय पक्षांची धाव असते. त्यामुळेच काही पक्ष आपल्याला ऑफर देत असले तरी कोणत्याही परिस्थितीत आपण सेना सोडणार नाही. ज्या बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने आपल्याला लहानाचे मोठे केले, खासदार केले त्या शिवसेनेला आपण सोडणे म्हणजे कृतघ्नता ठरेल.
उल्लेखनीय म्हणजे, खासदार भावना गवळी आणि कॅप्टन प्रशांत सुर्वे हे दाम्पत्य अलीकडेच ९ नोव्हेंबर रोजी रीतसर विभक्त झाल्यापासून कॅप्टन प्रशांत सुर्वे राजकारणात येण्यास कमालीचे उत्सुक आहेत.
कांॅग्रेस की राष्ट्रवादी कांॅग्रेस, अशा व्दिधा मनस्थितीत आहेत. त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यश माणिकराव ठाकरे, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी खासदार हरिभाऊ राठोड आदि नेत्यांच्या भेटी घेतल्या. राकॉं नेते अजितदादा पवार, आमदार संदीप बाजोरीया या नेत्यांशीही त्यांनी चर्चा केली आहे. कॅप्टन सुर्वे यांना त्यांच्या हितचिंतकांनी सांगितले की, कांॅग्रेसमध्ये तात्काळ काहीही मिळणार नाही, कारण तेथे प्रतीक्षा कालावधी फार दीर्घ असतो. खासदार भावना गवळी यांना रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष कॅप्टन सुर्वे यांना प्रवेश देण्यास तयार आहेत, मात्र म इधर जाऊ या उधर जाऊ, अशा मनस्थितीत कॅप्टन सुर्वे असल्यामुळे त्यांचाच निर्णय अद्याप झालेला नाही, अशी राजकीय चर्चा आहे.  कॅप्टन सुर्वे यांनी वाशीम येथे बंगला बांधला आहे. एअर इंडियात पायलट असलेले कॅप्टन सुर्वे राजकारणात येण्यासाठी एअर इंडियाला राम राम करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. कॉंग्रेसचा हात पकडायचा की, राष्ट्रवादीचे घडय़ाळ बांधायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.