जलसंपदा विभागातील अनागोंदी उघडकीस आणणारे राज्य तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य तथा ‘मेटा’चे मुख्य अभियंता विजय पांढरे, ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर, चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील यांच्यासह वीस जणांची यंदाच्या गिरणा गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचा वितरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी चार वाजता खा. राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्यावतीने यंदाच्या पुरस्कार्थीची नांवे जाहीर करण्यात आली. पुरस्काराचे हे १३ वे वर्ष असून सामाजिक, साहित्यिक, सहकार, वैद्यकीय, पर्यावरण, शेती, कला, उद्योग आदी क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गिरणा गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ कलावंत रघुवीर खेडकर, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, समाजसेविका अ‍ॅड. अपर्णाताई रामतीर्थकर, उद्योगपती अशोक कटारिया, चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य अभियंता विजय पांढरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश अवधूत, माजी आमदार जीवा पांडू गावित, धुळ्याच्या महापौर मंजुळा गावित, पोलीस निरीक्षक बाजीराव शिंदे, अ‍ॅड. पंडितराव भदाणे, श्रावण म्हसदे, कृषीमित्र खेमराज कौर, शंकरराव बर्वे, डॉ. दिलीप शिंदे, अनिल पाटील, कवी विलास पगार, नंदकुमार खैरनार, केशव रायते, किशोर पगार यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी दुपारी चार वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात आयोजित सोहळ्यात करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खा. राजू शेट्टी, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख व उद्धव आहेर उपस्थित राहणार आहेत. यावेळी तहानलेला महाराष्ट्र, दुष्काळाच्या झळा या विषयावर चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात
आले आहे. तसेच कुबेर जाधव लिखीत ‘सहकारनामा’ पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली.