scorecardresearch

नवी मुंबईत ग्लोबल कोकण महोत्सव

कोकणच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत साजरा होणारा ग्लोबल कोकण महोत्सव यंदा नवी मुंबईतील सानपाडा

कोकणच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत साजरा होणारा ग्लोबल कोकण महोत्सव यंदा नवी मुंबईतील सानपाडा या उपनगरात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न वाढावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऊपक्रम राबविले जात असून ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवाच्या माध्यमातून हे ऊत्पन्न आणखी वाढू लागले आहे. कोकणच्या संस्कृतीसह तेथे होत असलेला विकास सगळ्यांपुढे यावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून निसर्गरम्य कोकणात घर घेण्याची संधी या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या मालमत्ता कर प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईकरांना मिळणार आहे.
कोकणातील संस्कृतीसह तेथे होत असलेला विकास हा सगळ्यांपुढे यावा, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदा महोत्सवाचे चौथे वर्ष असून नवी मुंबईतील सानपाडा या उपनगरातील सेक्टर १८ येथील सिडको मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवात बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई या संस्थेच्या माध्यमातून मालमत्ता प्रदर्शन भरविले जाणार असून कोकणातील वेगवेगळ्या भागात पसंतीची घरे खरेदी करण्याची नामी संधी या महोत्सवाच्या माध्यमातून ऊपलब्ध होणार आहे, अशी माहिती या महोत्सवाचे निमंत्रक तसेच ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी पत्रकारांना दिली. या महोत्सवाचा शुभारंभ केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असून, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
मुंबई हा कोकणचा भाग असून येथे कोकणातील रहिवाशांचा मोठा भरणा दिसून येतो. पर्यटनाच्या दृष्टीने झपाटय़ाने विकसित होणाऱ्या कोकणात एखादे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. कोकणाला सुमारे ७५० किलोमीटरची विस्तीर्ण अशी किनारपट्टी लाभली आहे. या समुद्रकिनाऱ्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करता यावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ग्लोबल कोकणसारख्या महोत्सवाच्या माध्यमातून तेथील मालमत्तांचे प्रदर्शन मांडले गेल्यास सेकंड होम घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठी संधी मिळेल, असा दावा खासदार नाईक यांनी केला. यावेळी काँग्रेस नेते भाई जगताप, महोत्सवाचे प्रमुख संयोजक अरुण बोंगीरवार, संजय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते. 

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त ( Thanenavi-mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Global kokan festival during 14 to 17 december in navi mumbai