येथील पंचगंगा बँकेने सन २०१२-१३ या संपलेल्या आर्थिक वर्षांत निश्चित केलेले २५० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट पूर्ण केले. नफ्यामध्ये विक्रमी वाढ होऊन ढोबळ नफा २.३६ कोटी होऊन सर्व तरतुदी करून बँकेस १.३७ कोटी इतका निव्वळ नफा झाला आहे. तसेच बँकेच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी १ लाख रुपयांचा निधी रा. स्व. संघ जनकल्याण समितीस दिला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष पी. एस. कुलकर्णी व उपाध्यक्षा माधुरी रा. कुलकर्णी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.    
बँकेने एप्रिल २०११ ते मार्च २०१६ या कालावधीसाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. या व्हिजनमध्ये पहिल्या व दुसऱ्या वर्षांचे उद्दिष्ट अपेक्षेप्रमाणे प्राप्त झाल्याने संचालक मंडळाचा आत्मविश्वास व्दिगुणीत झाला आहे. व्हिजनमधील तिसऱ्या २०१३-१४ या वर्षांसाठी बँकेने ३०० कोटी व्यवसाय व शून्य टक्के एनपीए करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे प्रतिकर्मचारी ४.५० कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचा संकल्प केला आहे, असे यावेळी कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.    बँकेने जाहीर केल्याप्रमाणे ग्राहकांसाठी कोअर बँकिंग सुविधा एप्रिल २०१२ पासून सुरू केली आहे. याशिवाय ग्राहकांना वैयक्तिक चेक बुक सुविधा व मोफत एसएमएस सुविधेचा लाभ मिळत आहे. लवकरच एटीएम सुविधाही ग्राहकांना देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी बँकेचे संचालक दिगंबर जोशी, विकास परांजपे, चंद्रशेखर जोशी, मनोज प्रसादे, प्रसाद लिमये, गिरीधर जोशी, वृषाली बंकापुरे, चंद्रशेखर धर्माधिकारी आदी उपस्थित होते.