मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणाऱ्या सोन्याच्या तस्करीत विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून येत आहे. हवाई गुप्तचर विभागाने मंगळवारी सोन्याच्या तस्करी प्रकरणात एका खाजगी हवाई कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्याला अटक केली आहे.
अबुधाबी येथून येणारा सुनील जगवानी हा प्रवासी तस्करीच्या माध्यमातून माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. मंगळवारी पहाटे जगवानी खाजगी विमानाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. त्याने आपल्याजवळ सिगारेटच्या बॉक्समध्ये दडवून आणलेले १३४ ग्रॅम सोने याच विमान कंपनीच्या सुरक्षा अधिकारी दीपक गोलानी याला दिले. अधिकाऱ्यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाइलमधील संभाषण तपासले तसेच दोघांची देवाणघेवाण होत असल्याचे सीसीटीव्ही चित्रणही ताब्यात घेतले आहे. गोलानीने यापूर्वी चार वेळा अशा पद्धतीने तस्करीत सहभाग घेतल्याचे सीमा शुल्क विभागाने सांगितले. गोलानी हा तिसऱ्या क्रमांकाचा सुरक्षा अधिकारी असून त्याला दरमहा दीड लाख पगार आहे. तस्करी रोखण्याच्या कामात सीमा शुल्क आणि हवाई गुप्तचर विभागाला सहकार्य करणे हा त्याच्या कामाचा भाग आहे. परंतु तोच तस्करीच्या कामात गुंतला होता.
विमानतळावरील विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा अशा पद्धतीने तस्करीतील सहभाग वाढत आहे. याबाबत माहिती देताना हवाई गुप्तचर विभागाचे प्रमुख मिलिंद लांजेवार यांनी सांगितले की, चालू वर्षांत आम्ही कारवाई करून १८ अशा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. परदेशातून आलेले प्रवासी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना लपवून आणलेले सोने देतात आणि मग हे कर्मचारी बाहेर जाऊन त्यांना ते सुपूर्द करतात अशा पद्धतीने ही सोन्याची तस्करी केली जाते.