व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला म्हणजे शिक्षण संपतानाच हमखास महिना लाखभर पगाराच्या नोकरीचे पत्र आपल्या हातात घेऊनच महाविद्यलयाच्या बाहेर पडायचे, असे काहीसे चित्र आजपर्यंत आपल्या डोळय़ासमोर आहे. पण आता हे चित्र बदलू लागले असून पारंपरिक अभ्यासक्रमांना मागणी वाढू लागली आहे. यंदाच्या ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मध्ये ही बाब प्रकर्षांने जाणवली आहे.
व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये दरवर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जातात. हीच प्रथा काही जुन्या महाविद्यालयांनीही महाविद्यालयातील व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमांसाठी सुरू केली. यावेळीही पारंपरिक अभ्यासक्रमांना कुणीही विचारत नव्हते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाने पुढाकार घेऊन पारंपरिक अभ्यासक्रमांसाठीही ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’ सुरू केले. सुरुवातीला कंपन्या पारंपरिक अभ्यासक्रमांना बगल देत होत्या. मात्र यंदा कंपन्यांकडून चक्क गणित, सांख्यिकी, रसायनशास्त्र अशा विषयांतील पदवीधरांना मागणी वाढल्याचे दिसून आले यामुळे कंपन्यांचा पारंपरिक अभ्यासक्रमातील रस लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनाही यामध्ये उत्साह वाढला आहे. यावर्षी रुईया महाविद्यालयातील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि सांख्यिकी अशा विषयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात पदवी मिळण्यापूर्वीच नोकरीचे पत्र आहे. अनेक वर्षांनी असा प्रवाह पाहवयास मिळत असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना विषयाची सखोल ओळख होत असून हा अभ्यास करणारे विद्यार्थी पुढे जाऊन चांगले संशोधन करू शकतात असे कंपन्यांना वाटते यामुळे ही मागणी वाढल्याचे निरीक्षण रुईया महाविद्यालयाचे प्लेसमेंट विभागाचे प्राध्यापक मनीष हाटे यांनी नोंदविले आहे. बहुतांश इंधन कंपन्यांमध्ये रसायनशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना मागणी आहे तर ‘टीआयएफआर’सारख्या संशोधन संस्थांमध्ये भौतिकशास्त्र आणि इतर पारंपरिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. अशीच परिस्थिती मुंबईतील बहुतांश महाविद्यालयांमध्ये असल्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाचे महत्त्व पुन्हा एकदा चर्चिले जाऊ लागले आहे. व्यवस्थापन शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत पारंपरिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मिळणारे पगार किंवा विद्यावेतन कमी असले तरी हा आकडा महिना ३० हजार रुपयांपर्यंत जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांची लाखाची ओंजळ
व्यवस्थापन शिक्षणात महाविद्यालयाची ओळखही त्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या नोकऱ्यांवरून ठरत असते. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ची खासियत असून तेथील विद्यार्थ्यांना यंदाही महिना दोन लाखांचा पगार मिळाला आहे. तर किमान पगारही ९७ हजार रुपये आहे. यंदा या संस्थेतील कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी ७१ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात ११६ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये सिटीबँक, स्टँडर्ड चार्टड बँक, एचएसबीसी बँक, जे. पी. मॉर्गन, आयसीआयसीआय बँक, पोमुरा, क्रिसिल अशा नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याचबरोबर वेलिंगकर इन्स्टिटय़ूटमध्येही सध्या कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू असून यामध्ये विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण पूर्ण होण्या आधीच चांगल्या पगाराची नोकरी हातात येऊ लागली आहे. आयआयटीमध्येही यंदा प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्लेसमेंटमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना मिळाल्या असून दरमाह तीन लाख रुपयांपर्यंतचे विद्यावेतन आयआयटीमधील विद्यार्थ्यांना मिळू लागले आहे.