गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय स्वप्नपूर्ती की दिवास्वप्न?

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या निर्मितीचा मार्ग पायवाटेच्या लोकार्पण समारंभातून खुला झाल्यासारखे वाटत असले तरी पुरेसा निधी न मिळाल्यास आणखी काही वर्षे स्वप्नपूर्तीसाठी नागपूरकरांना वाट पाहणे नशिबी येणार आहे.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या निर्मितीचा मार्ग पायवाटेच्या लोकार्पण समारंभातून खुला झाल्यासारखे वाटत असले तरी पुरेसा निधी न मिळाल्यास आणखी काही वर्षे स्वप्नपूर्तीसाठी नागपूरकरांना वाट पाहणे नशिबी येणार आहे. दुसरीकडे गोरेवाडय़ातील निसर्ग पायवाट तयार करण्यासाठी झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणवादी अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, नागपुरातील लोकप्रतिनिधी तसेच वन खात्यातील बडय़ा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोरेवाडा तलावाच्या हद्दीवरील निसर्ग पायवाटेचे नुकतेच थाटमाटात लोकार्पण झाले होते. ही पायवाट ८ किलोमीटरची राहणार आहे.
गोरेवाडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील प्रस्तावित १९१४ हेक्टर वनक्षेत्र वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्राणिसंग्रहालयाने देशी-विदेशी पर्यटकांचे नागपुरातील येणे-जाणे वाढणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोरेवाडय़ातील उपलब्ध वनक्षेत्रावर आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. त्याअंतर्गत वन विकास महामंडळाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली असून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे सदर प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत वापरण्यात येणारी २८.३७ हेक्टर जमीन राज्य शासनाचे भागभांडवल असेल.
मध्य भारतातील विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्यजीवांचे संवर्धन आणि जैववैविध्याच्या संरक्षणाबरोबरच आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपूर-कळमेश्वर मार्गावरील गोरेवाडा वनक्षेत्रात आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उभारले जात असून आगामी काही वर्षांत जनतेसाठी खुले होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, २७.३० हेक्टरचे शासकीय वनेत्तर क्षेत्र वन विकास महामंडळाकडे अद्याप हस्तांतरित झालेले नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कामाला गती येण्याची शक्यता आहे.
राज्यात सहा राष्ट्रीय उद्याने आणि ४० अभयारण्ये असून ६ नवीन अभयारण्यांची नुकतीच निर्मिती करण्यात आली आहे. राज्यातील चारपैकी तीन व्याघ्र प्रकल्प विदर्भात असून यात ताडोबा जगातील वन्यजीव पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण समजले जाते. विदर्भात २००९ च्या तुलनेत १०३ वाघ होते. २०११ च्या शास्त्रोक्त व्याघ्रगणनेनुसार ही संख्या वाढली असून १७० झाली आहे. निसर्गाचा आनंद लुटतानाच जैववैविध्याची माहिती देणाऱ्या या प्रस्तावित प्रकल्पाचे महत्त्व पर्यटनाच्या दृष्टीने वाढले आहे. नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) वन्यप्राणी बचाव केंद्र तसेच प्रजनन व संवर्धन केंद्र स्थापन करण्यासाठी तत्वत: मान्यता दिली आहे. प्रकल्पातील कामांच्या अंमलबजावणीची परवानगी मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून प्रस्तावित प्राणीसंग्रहालय आणि बायोपार्क उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज (इंटरलोकेटरी अप्लिकेशन) दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. वनक्षेत्र संरक्षण आणि प्रकल्पाशी निगडित प्राथमिक स्वरुपाची कामे करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन घटक स्थापन करण्यास तसेच ४४ पदांच्या निर्मितीस मान्यता मिळाली
आहे.
आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाच्या ८ किलोमीटर संरक्षक भिंतीचे बांधकाम आणि १४.३० किमी भिंतीच्या प्लिंथचे काम पूर्ण झाले आहे.  गेल्यावर्षीच्या आर्थिक वर्षांत १० कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला होता. तर यंदाच्या आर्थिक वर्षांसाठी ७.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.  
प्राणिसंग्रहालयातील प्रस्तावित वैशिष्टय़े
१. स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार
२. सिंगापूरच्या धर्तीवर नाईट सफारी
३. पक्षीप्रेमींसाठी शास्त्रोक्त अभ्यासाची सोय
४. जैववैविध्याची विस्तृत माहिती/रोपवाटिका
५. वन्यजीव बचाव केंद्र व बायोपार्क
६. आंतरराष्ट्रीय पर्यटन/निसर्ग/वन्यजीव शिक्षण

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gorewada international zoo is dream completion or only dream