जिल्ह्य़ातील पहिल्या खासगी बाजार समितीचे उद्या उद्घाटन
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध अडचणींवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती साकारण्यात आली आहे. प्रचलित बाजार समित्यांमधील संघटित घटकांची मक्तेदारी मोडून शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न खासगी बाजार समितीमार्फत केला जाईल, असा दावा केला जात आहे. गुरुवारी या खासगी बाजार समितीचे उद्घाटन आ. माणिक कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे.
नांदूर नाक्यावरील निलगिरी बागेसमोर १५ एकर क्षेत्रांत ही बाजार समिती आकारास आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषीमालास मिळणारा भाव हा नेहमीच शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय. काबाडकष्ट करूनही त्यांना अपेक्षित भाव कधी मिळत नाही. व्यापाऱ्यांची एकजूट असल्याने शेतकऱ्यांची अवस्था दोलायमान राहते. या बाबी लक्षात घेऊन डाळिंब व्यापारी बापू पिंगळे यांनी खासगी बाजार समितीची संकल्पना मांडली. शासनाने खासगी बाजार समित्यांना चालना देण्याचे धोरण जाहीर केल्यावर त्यांनी त्या अनुषंगाने काम सुरू केले. प्रचलित बाजार व्यवस्थेत आडते, व्यापारी, बाजार व प्रवेश शुल्क आदी कारणास्तव शेतकरी भरडला जातो. या व्यवहारात पारदर्शकता नसते. या शिवाय, बाजार समित्यांमध्ये असणारी अस्वच्छता, कृषीमालाची होणारी चोरी हे तर नित्याचेच प्रकार. व्यापारी एकजुटीने भाव पाडून कृषीमाल खरेदी करतात. या सर्व घटनाक्रमाकडे बाजार समिती व्यवस्थापन कानाडोळा करण्याची भूमिका घेते. या पाश्र्वभूमीवर, खासगी बाजार समिती उपयुक्त ठरणार असल्याचे पिंगळे यांनी म्हटले
आहे.
‘परफेक्ट कृषी मार्केट यार्ड’ या नावाने साकारलेल्या खासगी बाजार समितीच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना कृषीमाल विक्रीसाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यामुळे कृषीमाल खरेदी-विक्रीत स्पर्धा वाढेल आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल. तसेच कृषी उत्पन्न  बाजार समितीत संघटित घटकांची मक्तेदारी मोडून काढण्यात खासगी बाजार समिती कळीची भूमिका बजावेल. खासगी बाजार समितीत सुसज्ज गाळे, रस्ते, प्रसाधनगृह, विक्री सभागृह उभारण्यात आले असून स्वच्छतेवरही बारकाईने लक्ष दिले जाईल. पिण्याचे शुद्ध पाणी, पॅकिंग हाऊस व माल ठेवण्यासाठी पुरेशी जागा, सुरळीत वीजपुरवठा आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त प्रत्येक व्यवहाराचे शेतकऱ्यांना जागेवरच रोखे पैसे दिले जातील. प्रचलित बाजार व्यवस्थेतील लूट पूर्णपणे थांबवून व्यवहारात पारदर्शक प्रक्रिया जोपासली जाईल. शेतीविषयक तांत्रिक मार्गदर्शन, निर्यातीच्या सुविधा व प्रोत्साहन यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. डाळिंबासोबत इतर फळफळावळ भाजीपाल्याचेही व्यवहार लवकरच या बाजारात होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आ. निर्मला गावित, नगरसेविका सुनीता निमसे व अश्विनी बोरस्ते, नगरसेवक उद्धव निमसे उपस्थित राहणार आहेत.