लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून आता सर्वाचे लक्ष मतदानाकडे लागले आहे. या प्रक्रियेत मतदार नोंदणी अभियानापासून सहभागी झालेल्या शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची मात्र या कामातून अद्याप सुटका झालेली नाही. मतदान प्रक्रियेत कार्यरत बहुतांश कर्मचारी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्या मूळ कार्यालयात रुजू झाले नाहीत.
परिणामी, या दिवशी अनेक शासकीय कार्यालयांत शुकशुकाट जाणवत होता. विविध कामानिमित्त शासकीय कार्यालयांत येणाऱ्यांना सोमवारी येण्याचा सल्ला दिला गेला. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात मतदान झाले. ही प्रक्रिया शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे नऊ हजार ६४० आणि नऊ हजार १६० अशा एकूण १८,७४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.
शहरातील वेगवेगळ्या सुमारे १००  शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांद्वारे या मनुष्यबळाची उपलब्धता करण्यात आली.
आचारसंहिता लागू झाल्यापासून ही सर्व मंडळी या प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनून सक्रिय राहिली. गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. विविध मतदान केंद्रांवरील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे व इतर साहित्य जिल्हा निवडणूक शाखेच्या स्वाधीन करत, सुटलो बुवा एकदाचे अशी त्यांची भावना होती. दिंडोरी मतदारसंघातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच उशिराने सुटका झाली. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारची मध्यरात्रही जागून काढावी लागली.
मतदान प्रक्रियेतून सुटका झालेले हे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी आपल्या मूळ कार्यालयाकडे फिरकले नाही. त्यातील काही कर्मचारी मतमोजणीपर्यंत या कामात गुंतलेले असण्याची शक्यता आहे. तथापि, आचारसंहिता लागू झाल्यापासून अनेक शासकीय कार्यालयांमध्ये दिसणारा शुकशुकाट मतदान झाल्यानंतरही कायम राहिला. या दिवशी अनेक सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांत विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना कोणाची भेट मिळू शकली नाही. वरिष्ठ मंडळी, पदाधिकारी हे बैठका व इतर कार्यक्रमांत व्यस्त होते.
उर्वरित मंडळी मतदानाच्या कैफातून बाहेर पडू शकली नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस व कर्मचारी सलग दुसऱ्या दिवशी निवडणुकीच्या कामात व्यस्त होती. जिल्हा परिषदेत यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची जिल्ह्याभरातील ठिकाणी नियुक्ती झाली असल्याने दुपापर्यंत त्यातील कोणी कार्यालयात पोहोचले
नव्हते. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ही मंडळी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिली. परिणामी जुजबी अथवा काही महत्त्वाच्या कामांची विचारणा करण्यासाठी आलेल्या नागरिकांची ‘या सोमवारी’ असे सांगून बोळवण झाली.