स. भु. शिक्षण संस्थेतर्फे बारावा गोविंदभाई श्रॉफ स्मृती संगीत महोत्सव शनिवारी (दि. ७) व रविवारी स. भु. मध्यवर्ती कार्यालय, नूतन इमारत पटांगण येथे आयोजित केला आहे. यंदा महोत्सवात शास्त्रीय गायिका मंजूषा पाटील, गायक डॉ. शशांक मक्तेदार, व्हायोलिनवादक सूरमणी पं. प्रभाकर धाकडे व उदयोन्मुख बासरीवादक ऐनोद्दीन वारसी यांचा मनोज्ञ कलाविष्कार औरंगाबादकरांना अनुभवता येणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर यांच्या हस्ते शनिवारी महोत्सवाचे उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर ऐनोद्दीन वारसी यांच्या बासरीवादनाने महोत्सवास प्रारंभ होईल. या नंतर आग्रा-ग्वाल्हेर-जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायक डॉ. शशांक मक्तेदार (गोवा) यांच्या शास्त्रीय गायनाने पहिल्या दिवशीच्या सत्राचा समारोप होईल. रविवारी (दि. ८) सूरमणी पं. प्रभाकर धाकडे (नागपूर) यांच्या  व्हायोलिनवादनाने दुसऱ्या दिवसाचे सत्र सुरू होईल. शास्त्रीय गायिका मंजूषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाची सांगता होईल. महोत्सवासाठी देणगी प्रवेशिका असून संस्थेचे कार्यालय, मे. जोशी ब्रदर्स (औरंगपुरा), मे. नाजुका डिपार्टमेंटल स्टोअर्स (चेतनानगर), मे. राहुल मेडिकल स्टोअर्स (बजरंग चौक, सिडको) येथे उपलब्ध आहेत. महोत्सवास रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. दिनकर बोरीकर, सरचिटणीस डॉ. अशोक भालेराव, रामकृष्ण जोशी, प्रकाश जेहुरकर आदींनी केले आहे.