साक्री, शिरपूर व धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुमारे २५ वर्षांपासून कुठल्याही प्रकारची वेतनवाढ देण्यात न आल्याने मंगळवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काडून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध केला.
वाढत्या महागाईची झळ सर्वाना बसली असताना अत्यंत कमी वेतनात काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत महासंघाने विविध प्रकारची आंदोलने करून किमान वेतन व महागाई भत्ता मंजूर करण्यास शासनास भाग पाडले. असे असतानाही धुळे जिल्ह्य़ात परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना किमान वेतन व महागाई भत्ता तत्काळ लागू करण्यासंदर्भात विनंती अर्ज देऊनही त्याबाबत ग्रामपंचायत अथवा पंचायत समिती स्तरावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. शहरातील बारापत्थर येथून मोर्चाला सुरुवात झाली. आग्रारोड, पाचकंदील, शहर पोलीस चौक यामार्गे जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकला. महाराष्ट्र राज्य महासंघाचे सचिव नामदेव चौहाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सचिव श्रावण शिंदे, प्रभाकर घरटे, साहेबराव पाटील आदींसह जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक मोठय़ा संख्येने सहभाग झाले.
जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकल्यानंतर आंदोलकांनी तिथेच ठिय्या दिला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्य़ातील ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबतही सरकारकडून चालढकलपणा करण्यात येत आहे. पाच हजार रुपये मानधन देऊनही व त्यांना यंत्रणेत समावून घेण्याबाबत आश्वासन देऊनही त्याबाबत धुळे जिल्ह्य़ात जिल्हा परिषद यंत्रणेने त्या संदर्भात कोणतीच हालचाल केली नाही. उलट काही ग्रामपंचायतीत नेमलेल्या ग्रामरोजगार सेवकांना कामावरून काढून टाकण्यात आले. कमी केलेल्या सेवकांच्या जागी मर्जीतील व्यक्तींना संधी देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामरोजगार सेवकांवर हा अन्याय असल्याने त्यांना नेमणुकीचे पत्र देण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.