मागील वर्षीच्या दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्य़ात यंदा द्राक्षाच्या उत्पादनात सुमारे ३० टक्के घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाणी टंचाईमुळे द्राक्षवेलींची छाटणी उशिराने होत असल्यामुळे दर्जेदार बेदाणा निर्मितीलाही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
द्राक्ष उत्पादनात अलीकडे सोलापूर जिल्ह्य़ाने आघाडी घेतली आहे. शिवाय बेदाणे निर्मितीतही या जिल्ह्य़ाने यशस्वी वाटचाल केली आहे. दरवर्षी १५ ऑक्टोबरनंतर द्राक्ष छाटणी केली जाते परंतु यंदा परतीच्या पावसाच्या भीतीने ब-याच द्राक्ष उत्पादक शेतक-यांनी लवकर म्हणजे १५ ऑक्टोबरपूर्वी द्राक्ष छाटणी उरकली. छाटणीनंतर सलग तीन-चार दिवस पडलेला पाऊस पालवी फुटलेल्या द्राक्ष बागांसाठी नुकसानकारक ठरला. द्राक्षवेलीवर करपा, दावण्या यासारख्या रोगांचे सावट पसरले होते. त्यामुळे पुन्हा द्राक्षवेलींची दुस-यांदा छाटणी करावी लागली. एकीकडे मागील उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी द्राक्षबागा टिकविण्याचे आव्हान होते. त्यावेळी पाणी टंचाईमुळे अनेक शेतक-यांच्या द्राक्षबागा ओस पडल्या, तर काही शेतक-यांनी एप्रिलमध्ये नियमित होणारी द्राक्ष छाटणी पुढे ढकलून ती जूनमध्ये केली.
जिल्ह्य़ात सुमारे २३ हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. एप्रिलमध्ये छाटणी केलेल्या काडय़ांमध्ये घडांची संख्या जास्त असते. त्यानंतर ही संख्या घटत जाते. जूनमध्ये छाटणी केलेल्या अनेक बागा वाया गेल्याचे सांगण्यात आले. गेल्या ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे द्राक्ष छाटणी पुढे ढकलण्यात आली असून सद्यस्थितीत ५० टक्के बागा द्राक्ष छाटणीविना राहिल्या आहेत. आता द्राक्ष छाटणी केल्यास द्राक्षाचे उत्पादन उशिराने येणार. शिवाय त्यातील गोडी नष्ट होऊन त्यात आंबटपणा येण्याची शक्यताही द्राक्ष बागायतदारांनी व्यक्त केली आहे.