मुंबई शहर व उपनगराच्या बरोबरीने लगतच्या मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर सरकार लक्ष देत असल्याने ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, वसई-विरार पट्टय़ात नव-नवीन गृहप्रकल्पांचा आरंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात येत आहे. ग्राहकांनी हा मुहूर्त साधावा यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्याबरोबरच आकर्षक बक्षीसांची घोषणा बिल्डरांनी केली आहे. विविध बँका गृहकर्ज स्वस्त आणि चटकन देण्याबाबतच्या जाहिराती करत असल्याने गुंतवणूकदारही या संधीचा लाभ घेण्यासाठी घरांच्या खरेदीत रस दाखवतील अशी बिल्डरांना आशा आहे.
गेल्या काही वर्षांत गृहनिर्माण प्रकल्पांमधील रिक्त घरे हा बांधकाम व्यावसायिकांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यात महाग गृहकर्ज हा एक महत्त्वाचा घटक होता. पण राष्ट्रीय बँकांपासून सहकारी बँकांनीही गृहकर्ज कमी दरात आणि तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या जाहिरातींचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे याचा सकारात्मक परिणाम होईल अशी बिल्डरांना आशा आहे.
मुंबई आणि लगतच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर या महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी छोटय़ा मोठय़ा आकाराचे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. मागील वर्षी ‘अक्षय तृतीया’, दसरा, दिवाळीचा पाडवा आणि असे घरखरेदीसाठीचे चांगले मुहूर्तही बिल्डरांसाठी तेजी आणणारे ठरले नाहीत. त्यामुळे आता गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी बिल्डरांनी कंबर कसली आहे.
पहिल्या १०० बुकिंगसाठी सवलतीचा विशेष दर काही बिल्डरांनी देऊ केला आहे. तर काही बिल्डरांनी नेहमीप्रमाणे आकर्षक बक्षिसांचे प्रलोभन इच्छुक ग्राहकांना दाखवले आहे. एका गृहनिर्माण प्रकल्पाने घराचा ताबा मिळाल्यानंतरच ८० टक्के रक्कम भरण्याची सवलत दिली आहे. तर नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क आणि सेवाकराचा बोजा ग्राहकांना मोठा वाटत असल्याने या शुल्कांचा बोजा उचलण्याची तयारी काही बिल्डरांनी दाखवली आहे. गेल्या दोन वर्षांत अशा सवलतींचा आणि प्रलोभनांचा फारसा परिणाम झाला नाही, गृहनिर्माण क्षेत्राला हवी तशी तेजी आली नाही. त्यामुळे यंदा देशात एकंदर मंदीचे वातावरण असताना, विकासदर खाली जात असताना मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय लोक या जाहिरातबाजीला कसा प्रतिसाद देतात याबाबत उत्सुकता आहे.
विशेष म्हणजे आता दोन-चार इमारतींऐवजी नानाविध सोयी-सुविधांना युक्त अशा भव्य गृहनिर्माण प्रकल्पांच्या उभारणीकडे बिल्डरांचा ओढा दिसत आहे. टिटवाळा, वसई, अंबरनाथ, बदलापूर येथील बहुतांश गृहप्रकल्प असेच मोठे आहेत. कनिष्ठ मध्यमवर्गीय ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काही बिल्डरांनी चक्क अर्धा बीएचके घरांची बांधणी हाती घेतली आहे.