दृष्टिबाधित मुलींसाठी राज्यात प्रथमच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड महाराष्ट्र, कोईम्बतूरचे युडीएस फोरम आणि सीबीएम इंटरनॅशनल या संस्थांच्या वतीने येथील नॅब संकुलात ‘१२ वी नंतर काय?’ याविषयावरील शिबीरात उच्च शिक्षणाच्या संधी आणि शिक्षणासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांच्या काय योजना आहेत. स्पर्धात्मक परीक्षेला कसे सामोरे जावे लागते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
शिबीरात कोल्हापूर, सोलापूर, लातूर, जळगाव, धुळे, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, अहमदनगर, सातारा या दहा जिल्ह्यातील निवडक ४० मुलींनी सहभाग घेतला. या दोन दिवसाच्या शिबीराचे उद्घाटन सिएट कंपनीचे महाव्यवस्थापक अभय पंचाक्षरी यांच्या हस्ते झाले. शिक्षणामुळेच महिला अधिक सक्षम होऊ शकतात. आपण अपंग आहोत ही भावना मनातून काढून टाका. सर्व क्षेत्रात तुम्हाला संधी आहे असे मत व्यक्त केले. शिबीरात एकूण १० सत्र घेण्यात आली. प्रत्येक सत्रात उच्च शिक्षणाच्या वाटा कशा आहेत त्यासंदर्भात स्वत: दृष्टिबाधित्वावर मात करून शिका व मोठे व्हा असा संदेश मान्यवरांनी दिला. त्यात प्रामुख्याने एसएनडीटी विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका सच्चू रामलिंगम, एअर इंडियात कार्यरत परिमल भट यांनी मार्गदर्शन केले. एसएमआरके महाविद्यालयातील प्रा. सिंधु काकडे यांनी महाविद्यालयीन शिक्षणाची दालने याविषयी माहिती दिली. कोईम्बतूरची युडीएस फोरम ही संस्था दृष्टिबाधीत मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या रुपाने कशी आर्थिक मदत करते याची माहिती दिली. पदवीसाठी दरवर्षी १२ हजार म्हणजे पूर्ण पदवी होईपर्यंत ३६ हजार रुपयाची मदत तसेच पदवीत्तर आणि बीएड् या दोन वर्षांसाठी ३६ हजार रूपयेा प्रत्येक विद्यार्थिनीला मिळेल अशी माहिती युडीएस फोरमचे कार्यकारी संचालक एस. शंकरन् यांनी दिली. सूर्यभान साळुंखे व मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी नॅब महाराष्ट्रच्या योजनांविषयी माहिती दिली.
प्रा. देविदास गिरी यांनी स्पर्धा परीक्षेव्दारे कोणत्या सुविधा व संधी उपलब्ध आहेत, त्याला कसे सामोरे जावे याविषयी तर, समाज कल्याण उपायुक्त राजेंद्र कलाल आणि पी. यु. पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांसह शिष्यवृत्ती, वसतीगृह, स्वयंरोजगार, कर्ज उपलब्धी याविषयावर मार्गदर्शन केले. कलाल यांच्या हस्ते शिबीरार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले.
शिबीर प्रथमच घेण्यात आल्याने राज्यातील मुलींची निवड करणे, त्यांच्याशी संपर्क करणे यासाठी अधिकारी व समन्वयक नीरजा संगमनेरकर, कल्याणी शेलार, विनोद जाधव तसेच संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, सचिव गोपी मयुर आणि सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, उपाध्यक्ष सूर्यभान साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.