लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने काय काम केले, याचे आत्मचिंतन करा. पक्ष मोठा तर आपण मोठे. देशात नरेंद्र मोदी यांची लाट होती. त्यात अनेक प्रबळ राजकीय पक्षांचाही निभाव लागला नाही. लोकसभा व विधानसभेची निवडणूक वेगवेगळी असते. लोकसभेच्या निकालांनी खचून जाऊ नका. महापालिकेत आपल्या प्रभागातील रखडलेल्या कामांसाठी पाठपुरावा करून आपली कामे व्यक्तीश: करून घ्या..
मनसेच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महापालिकेतील आपल्याच पक्षाच्या नगरसेवकांना केलेले हे मार्गदर्शन. लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ल्यात थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या मनसेने धक्कादायक व अनपेक्षित निकालानंतर नगरसेवक वा अन्य कोणावर त्याचे खापर न फोडता संयमाने परिस्थिती हाताळण्याचा मार्ग चोखाळला आहे. पालिकेतील सत्तेच्या प्रभावाने सर्व नगरसेवकांनी बालेकिल्ल्यात पुन्हा पक्षाची नाळ घट्ट रोवण्यासाठी प्रयत्न करावेत असे नियोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. गतवेळी काँग्रेस आघाडीची दमछाक करणारा मनसे यंदा थेट तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. डॉ. प्रदीप पवार यांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की मनसेवर ओढवली. मतपेटीतून निकाल बाहेर येण्याआधीच अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर बदल केले. मनसेच्या संपर्क प्रमुखपदी अविनाश अभ्यंकर तर शहराध्यक्षपदाची धुरा अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्यावर सोपविण्यात आली. तसेच उपशहराध्यक्षपद भूषविणाऱ्या शर्वरी लथ यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. दरम्यानच्या काळात मनसेचे स्थानिक आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी राज यांनी मुंबईत बैठक घेऊन चर्चा केली होती. लोकसभा निवडणुकीत खुद्द राज यांची नगरसेवकांवर मुख्य भिस्त होती. परंतु, निकालानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. निकालांमुळे मनसेत वादळ उठणार अशी अनेकांना धास्ती असताना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मात्र स्थिती कौशल्यपूर्वक हाताळण्यास प्राधान्य दिल्याचे दिसते. त्याची प्रचीती गुरुवारी मनसेच्या राजगड कार्यालयात आयोजित नगरसेवकांच्या बैठकीत आली.
आ. वसंत गीते, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे व शहराध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी नगरसेवकांना जनतेच्या प्रश्नांवर नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. ३१ मे रोजी मुंबईत राज यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगरसेवक मुंबईला जाणार आहेत. ही सभा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनावर बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या प्रवक्त्या शर्वरी लथ यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण राज हे जाहीर सभेत करणार आहेत. नाशिकमध्ये निकालाआधीच त्यांनी प्रत्येक नगरसेवकाशी व्यक्तीश: चर्चा केली आहे. लोकसभेच्या निकालाने कोणी खचून जाऊ नये. लोकसभा, विधानसभा वा महापालिका ही प्रत्येक निवडणूक वेगवेगळी असते. मनसेच्या सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील प्रश्न मांडण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी. पालिकेतील अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करून आपली कामे करून घेण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना आ. गीते यांनी केली.
मनसेच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात मोठय़ा प्रमाणात विकास कामे केली आहेत. ही कामे जनतेसमोर जाणे आवश्यक आहे. तसेच शहरवासीयांच्या प्रश्नांसाठी मनसेचे नगरसेवक झगडत असल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी पालिकेत ‘मौनी’ अशी प्रतिमा झालेल्या नगरसेवकांनी बोलते व्हावे, असा सल्ला यावेळी देण्यात आला. मनसेच्या नगरसेवकांनी मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन आ. गीते यांनी केले. शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे अ‍ॅड. ढिकले व प्रवक्तेपदी निवड झालेल्या लथ यांचा नगरसेविका सुजाता डेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निकालानंतरची ही पहिलीच बैठक होती. त्यामुळे प्रचारादरम्यानच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जातील अशी अनेकांना धास्ती होती. तथापि, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक पार पडल्याने नगरसेवकांनी सुटकेचा निश्वास टाकला.