पर्याय नसल्याने समायोजन रखडल्यामुळे नियमित वेतनास मुकलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील ५८ गुजराती आणि सिंधी माध्यमांतील शिक्षकांना हिंदी माध्यमातील शाळांमध्ये समाविष्ट करण्यास शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील मराठी, गुजराती आणि सिंधी माध्यमाच्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यातही गुजराती आणि सिंधी माध्यमात इतर ठिकाणीही जागा उपलब्ध नसल्याने त्यांच्या समायोजनाबाबत पेच निर्माण झाला होता. या संदर्भात राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, दिलीप डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक न. ब. चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना ही समस्या सांगितली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत १८ जून रोजी एका पत्रान्वये गुजराती माध्यमाच्या ४२ आणि सिंधी माध्यमाच्या १६ अशा एकूण ५८ शिक्षकांचे हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये समायोजन करण्यास शिक्षण संचालकांनी परवानगी दिली आहे.  
यापूर्वी मराठी माध्यमातील ३३ शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते. मात्र त्या शिक्षण संस्था शिक्षकांना शाळेत हजर करून घेण्यास तयार नव्हत्या. अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.