जिल्ह्यातील बहुतांश भागात सातत्याने बसलेल्या गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे ही गारपीट जमिनीच्या पोतवर परिणाम करणार असल्याची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे. तथापि, गारपिटीमुळे जमिनीची काहीशी धूप होण्याव्यतिरिक्त तिचा पोत बिघडण्याची वा उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे निफाडच्या कृषी संशोधन केंद्राने म्हटले आहे.

मागील दीड ते दोन वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पावसाची मालिका सुरू आहे. गत आठवडय़ात सलग पाच दिवस हे संकट कोसळले. निफाड, सिन्नर, बागलाणसह काही भागात टपोऱ्या आकाराच्या गारांनी द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, हरभरा, गहू आदी पिके भुईसपाट केली. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. एका झटक्यात होत्याचे नव्हते करणाऱ्या संकटाने पुढील कित्येक वर्ष शेतकरी उभा राहू शकणार नसल्याची भावना उमटत आहे. द्राक्षवेलींची लावड अतिशय खर्चिक बाब आहे. एकदा लागवड केल्यावर पुढील १० ते १२ वर्ष त्या वेलीतून उत्पादन मिळत असते. यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांची जपवणूक करावी लागते. गारांनी द्राक्ष घडांसोबत वेलींना क्षतीग्रस्त केले. पाने गळून पडली. वेलींना असंख्य जखमा झाल्या. यामुळे या वेलीतून पुढील दोन वर्ष चांगले उत्पादन निघणार नाही असे बहुतांश उत्पादकांचे म्हणणे आहे. गारांमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असते. यामुळे जमिनीचा पोत बिघडविण्यास ती कारक ठरणार असल्याची भिती बागलाणच्या डॉ. शेषराव पाटील यांच्यासह अनेकांनी व्यक्त केली. जमिनीत मिठाचे प्रमाण वाढते आणि कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्याने पुढील काळात काही लागवड केली तरी पिके कुपोषित राहतील याची धास्ती व्यक्त होत आहे.
अनेक शेतकऱ्यांना गारपिटीमुळे जमिनीच्या पोतवर परिणाम होईल याची भ्रांत आहे. या पाश्र्वभूमीवर, निफाडच्या कृषी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली असता तसा कोणताही धोका नसल्याचे डॉ. कल्याण देवळाणकर व संशोधक अविनाश गोसावी यांनी स्पष्ट केले. पाऊस आणि गारपीट यात फारसा फरक नसतो. पाण्याचे द्रवरुप आणि घनरुप हे आविष्कार आहेत. त्यात रासायनिक असा कोणताही प्रभावी घटक नसतो. यामुळे जमिनीचा पोत बिघडण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात सर्वत्र काळ्या मातीची जमीन आहे. पावसाळ्यात पाणी वाहते राहिल्यास जमिनीची मोठय़ा प्रमाणात धूप होते. अलीकडेच झालेल्या गारपिटीने जमिनीची काही अंशी धूप वगळता अन्य कोणताही परिणाम होणार नाही. जमिनीवरील १२ ते १५ सेंटीमिटरचा थर कृषी उत्पादनासाठी महत्वाचा असतो. सुक्ष्म जिवाणू, जलधारण क्षमता, अन्नद्रव्यांचे प्रमाण, सामू, क्षार यावर जमिनीचा पोत निश्चित होतो. यामुळे गारपिटीचा जमिनीच्या पोतवर वेगळा काही प्रभाव पडणार नसल्याचे देवळाणकर व गोसावी यांनी सांगितले.