जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे. या मतदारांना जागृत करण्यासाठी येत्या जानेवारीपासून देशव्यापी दौरा करणार असल्याची घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज ब्लॉगद्वारे केली.
दीड वर्षे चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान प्रत्येक राज्यातील मतदारांना, तरूणांना जागृत करून देश पातळीवर मोठय़ा प्रमाणावर संघटन करण्यात येणार आहे, असे जाहीर करतानाच तरूणांनी या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. हजारे यांनी केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची व देशातील जनतेची अधोगती झाली. याला अनेक कारणे असली तरी स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे उलटली तरीही मतदारांना आपल्या मताची किंमत समजलेली नाही, हे अधोगतीचे महत्वाचे कारण आहे.
आजही अनेक मतदार आपले मत विकतात, दारूच्या आमिषाला बळी पडतात, नातेसंबंध पाहून मतदान केले जाते. त्यामुळे विधानसभा, लोकसभेसारख्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरांमध्ये गुंड, भ्रष्टाचारी, व्यभीचारी, लुटारू लोकांचा शिरकाव होतो. अशा लोकप्रतिनिधींना देशाच्या, जनतेच्या उज्वल भवितव्याची चिंता नसते. ते देश लुटण्यास निघतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी, भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीसाठी गाव, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर मतदारांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारने विदेशी कंपन्यांसाठी पायघडय़ा घातल्या आहेत. त्यांना जमीन मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जात आहे. जमीन देण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार केला जातो. गोळय़ा घालण्यात येतात. सरकारची ही कृती लोकशाहीविरोधी आहे. लोकशाही, संविधानाविरोधात काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली असल्याचे व त्यासाठी तरूणांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरूणांनी राळेगणसिध्दी येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.