नाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या जोडीचे बऱ्याच कोलावधीनंतर आलेले नाटक हे जसे ‘गेट वेल सून’चे आकर्षण आहे तसेच स्वप्नील जोशीसारख्या अभिनेत्याचे रंगमंचावर येणे हासुध्दा या नाटकासाठी जुळून आलेला छान योगायोग होता. अष्टविनायक आणि जिगीषा या दोन नाटय़संस्थांनी एकत्र येऊन केलेलं ‘गेट वेल सून’ हे नाटक रविवारी, २४ नोव्हेंबरला आपलं अर्धशतक साजरं करणार आहे. या नाटकाचा ‘अर्धशतक’ सोहळा रविवारी दुपारी नाटय़संकुल येथे होणार असून त्याचवेळी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या ‘मुक्तीपत्रे’ या गाजलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती निर्मातेद्वयी श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव यांनी दिली आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांची संकल्पना, प्रदीप मुळ्येंचं नेपथ्य यामुळे ‘गेट वेल सून’ हे नाटक अल्पावधीत लोकप्रिय ठरले. स्वप्नीलसह संदीप मेहता, समिधा गुरू आणि माधवी कुलकर्णी यांच्याही अभिनयाचे कौतूक झाले आहे. या नाटकाचे येत्या दोन महिन्यांत गोवा, औरंगाबाद आणि नागपूर येथेही दौरे आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहितीही निर्मात्यांनी दिली.