नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या रामझुला पुलाचे अर्धवट बांधकाम नागपूरकरांसाठी प्रचंड डोकेदुखी झाली आहे. रामझुल्याचे काम कित्येक वर्षांपासून सुरूच असून ते पूर्ण होण्याची पोकळ आश्वासने पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली असली तरी प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत संथ असून वाहतूक कोंडीला रोज सामोरे जावे लागत असल्याने नागपूरकर त्रस्त आहे.
राझुल्याच्या बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी शानदार समारंभात केले होते. हा पूल लवकरच जनतेच्या सोयीसाठी वाहतुकीला खुला करून दिला जाईल, याची हमी देण्यात आली होती. परंतु, झुल्याचे काम तर पूर्ण झालेलेच नाही. उलट या भागातील वाहतुकीत बांधकामामुळे अडथळेच निर्माण होत असल्याचे चित्र रोजचेच झाले आहे. बांधकामाची गती का मंदावली या प्रश्नाचे उत्तर संबंधितांजवळ नाही.
युवक काँग्रेसचे माजी सचिव मोहम्मद आरिफ पल्ला यांनी नुकेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक निवेदन सादर करून रामझुल्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. अर्धवट बांधकामामुळे मध्य नागपुरातील जनतेला सर्वात मोठय़ा वाहतूक खोळंब्याचा सामना करावा लागत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. पोद्दारेश्वर राम मंदिरापाशी वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होत असून रेल्वे स्थानकाकडे जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. वाहतूक यंत्रणेवरही यामुळे मोठा ताण पडत आहे. हा परिसर प्रचंड गर्दीचा आणि व्यापारी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संत्रा मार्केटही याच भागात असल्याने गर्दी रोजचीच असते. शिवाय सरकारी कार्यालयांचीही संख्या भरपूर असून कामावर जाताना लोकांना विनाकारण अडकून पडावे लागते.