पडीक जमिनीवरील प्लॉटची ग्रामपंचायतीत आठ अ मध्ये नोंद घेण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सरपंचपतीस लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. समद खासीम बागवान असे त्याचे नाव आहे.
लोहारा शहरातील सविता फावडे यांच्या नावे लोहारा सव्र्हे नंबर १४५ मधील पडीक ९४ आर जमिनीतील शेतजमिनीचे ले-आऊट तयार करून त्याचे ६४ प्लॉट्स पाडून त्याला महादेवनगर असे नाव देण्यात आले. गेल्या ११ डिसेंबरला सरपंच, ग्रामविकास अधिकारी व सर्व ग्रा. पं. सदस्यांच्या नावाने या प्लॉट्सची ग्रामपंचायतीत आठ अ दफ्तरी नोंद घेण्यास फावडे यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला. यानंतर ३ महिन्यांत सरपंच नसिमाबी बागवान, ग्रामसेवक चोरमले व पांचाळ यांना भेटून या प्लॉटची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद घेण्याची विनंती केली होती. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले.
सरपंचपती बागवान याने आपण सरपंच, ग्रामसेवक व ग्रा. पं.च्या सर्व सदस्यांना सांगून हे काम करून देतो, असे सांगून त्यासाठी ९० हजार रुपये देण्याची मागणी केली. यातील २० हजार रुपये २२ जानेवारीला घेतले. उर्वरित ७० हजार रुपये १० फेब्रुवारीला देण्याचे ठरले होते. फावडे यांनी लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सापळा लावला. तडजोडीअंती २० हजार रुपये लाच घेताना बागवान याला सोमवारी रंगेहाथ पकडले. लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.