अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या नरिमन पॉइंट, चर्चगेट, कुलाबा या परिसरात सध्या पाण्याची मोठय़ा प्रमाणावर गळती होत असून दुषित पाणीपुरवठय़ामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. गळतीची दुरुस्ती करण्यात पालिकेचा जलविभाग अपयशी ठरल्यामुळे या विभागातील नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चर्चगेट, नरिमन पॉइंट आणि कुलाबा परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पाणीपुरवठय़ाच्या वेळी अनेक ठिकाणी रस्त्याखालून पाणी वर येत असल्याच्या प्रकाराकडे जलविभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जमिनीखालील फुटलेल्या जलवाहिन्यांमध्ये सांडपाणी शिरून चर्चगेटमधील काही इमारतींना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे दुषित पाणीपुरवठा होत आहे हे शोधण्यासाठी जलविभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागल्याने या इमारतींना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. महत्त्वाच्या व्यक्तींपैकी काही जण या इमारतीत राहात असल्यामुळे पालिकेच्या जलविभागाचे अधिकारी धास्तावले होते. तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर दुषित पाणीपुरवठय़ाचे कारण अधिकाऱ्यांना उमगले. जुनाट जलवाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर दुषित पाणीपुरवठा बंद झाला आणि अधिकाऱ्यांनी सुस्कारा टाकला. चर्चगेटमधील दुषित पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सुटला असला तरी आजही या परिसरात अनेक ठिकाणी पाण्याची मोठय़ा प्रमाणावर गळती होत आहे. पाणीपुरवठय़ाच्या वेळी अनेक ठिकाणी रस्त्याखालील जलवाहिन्यांमधून पाणी झिरपत आहे. जलवाहिन्यांतून होत असलेल्या गळतीचा शोध घेण्यासाठी पालिकेकडे स्वतंत्र अशी यंत्रणाच नाही. कुणी तक्रार केली तर पालिकेचे अधिकारी तेथे धाव घेतात आणि तात्पुरती दुरुस्ती करून गळतीची समस्या दूर करतात. पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असल्यामुळे संपूर्ण मुंबईला पाणी गळतीची समस्या भेडसावत आहे. गळतीमुळे जमीनखालील भाग कमकूवत होऊन रस्ता खचण्याचे प्रकारही मुंबईत वाढू लागले असून या समस्येमुळे भविष्यात मुंबईत गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करून या पाणी गळतीला आळा घालण्याची आवश्यकता आहे. मात्र महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.