सध्या जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात हिवताप, डेंगी, कावीळ अशा विविध साथींच्या आजारांच्या रुग्णांत चांगलीच वाढ झाली आहे. स्वाइन फ्लूनेही पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक रुग्ण ग्रामीण भागात चांगली आरोग्यसुविधा उपलब्ध होत नाही म्हणून शहरी भागात उपचारासाठी येतात, त्या रुग्णांची नेमकी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसते, त्यामुळे अनेकदा विभागाची ही आकडेवारी फसवीच ठरते. त्यातून उपाययोजना दूरच राहतात. दरवर्षीच्या पावसाळय़ात ग्रामपंचायत व आरोग्य विभागात साथींच्या लागणीची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा आवडता खेळ रंगत असतो, तसा तो यंदाही रंगला आहे. पदाधिकारी आणि सदस्यही या खेळाकडे तटस्थपणे पाहात आहेत. कुपोषणमुक्तीच्या कागदावरील आकडेवारीच्या आधारावर जिल्हा परिषद स्वत:ची पाठ थोपटून घेत असताना, साथीचे आजार बालकांच्या कुपोषणाला हातभार लावतात याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खरा प्रश्न आहे तो स्वच्छतेच्या जनजागृतीचा. त्या आघाडीवर तर आनंदीआनंदच आहे.
चार-पाच वर्षांपूर्वी ग्रामविकास विभागाच्या प्रोत्साहनातून स्वच्छता अभियानाच्या चळवळीने जिल्हय़ात चांगला जोर पकडला होता. त्यातून ३१२ गावे निर्मलग्राम झाली. किमान शंभर गावे काठावर होती. या अभियानाचा आणखी एक फायदा झाला होता, स्वच्छतेमुळे साथीचे आजार नियंत्रणात आले होते, रुग्णांची संख्या कमी झाली होती. हे जिल्हा परिषदेच्याच यंत्रणेने त्या वेळी आकडेवारीसह जाहीर केले होते. परंतु या अभियानाकडे आता यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या तीन वर्षांत एकही गाव निर्मल होऊ शकले नाही. शौचालय उभारणीचा वेगही मंदावला, त्यासाठी आलेला निधीही पडून असतो. आलेला निधी केवळ पंचायत समिती व ग्रामपंचायतींकडे वर्ग करून वरिष्ठ अधिकारी मोकळे होतात. पाठपुराव्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अभियानात एकप्रकारची मरगळ आली आहे. जिल्हा परिषदेकडेही यासाठीच्या एकसूत्रीपणाचा अभाव जाणवतो. अभियानाची सूत्रे एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे टोलवली जात आहेत. तीन वर्षांच्या खंडानंतर आता यंदा ५८ गावे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
दूषित पाणीपुरवठा हेही एक कारण ठरते आहे. जिल्हय़ातील पंधरा ते वीस गावे क्षारयुक्त पाण्याने बाधित आहेत. गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळामुळे पिण्याच्या पाणी योजनांचे अनेक उद्भव कोरडे पडले. पावसाळा सुरू असला तरी जिल्हय़ात पुरेसा पाऊस झालेला नाही. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही उद्भवांना पाणी आले असले तरी ते दूषित आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग योजनांतील पाणी शुद्धीकरणासाठी काळजी घेत नाहीत, टँकरने पाणीपुरवठा करतानाही व ते पाणी गावातील ज्या टाक्यांमधून साठवले जाते त्याच्या स्वच्छतेकडे आणि शुद्धीकरणाकडे लक्ष दिले जात नाही. अशा अनेक कारणांनी आजारांची संख्या वाढते आणि साथ फैलावते आहे. मुंगी (शेवगाव), कोल्हार (राहाता), धामणगाव (कोपरगाव) येथे प्रादुर्भाव आढळून आला. ग्रामपंचायतींना जलशुद्धीकरणासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्ग दिला गेला तरीही ही परिस्थिती कायम आहे.
अनेक ग्रामपंचायतींकडे जलशुद्धीकरणाच्या औषधांचा तुटवडा आहे. यंत्रे नसल्याने डासांची उत्पती रोखण्यासाठी धूर फवारणीही होत नाही. चार वर्षांपूर्वी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने दिलेली यंत्रे कोणत्या ग्रामपंचायतींकडे आहेत, त्यातील किती सुस्थितीत आहेत, किती गायब झाली, याची माहिती जिल्हा परिषदेकडे नाही. स्वाइन फ्लूने सन २००९ मध्ये राज्यभर थैमान घातले होते. तो पुन्हा डोके वर काढू लागला आहे. जिल्हय़ात अनेकांना लागण झाली आहे. जामखेड तालुक्यातील पारेगावमध्ये एका महिलेचा स्वाइन फ्लूने गेल्या आठवडय़ात मृत्यू झाला. आरोग्य समितीच्या सभापती व उपाध्यक्ष मोनका राजळे यांच्या गावात न्यूमोनियाने एकाचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तुटवडा असला तरी अनेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नोकरीच्या ठिकाणी राहात नाहीत, त्याचाही परिणाम आरोग्यसेवेवर होतो.
साथरोगांना प्रतिबंध करणारी व्यवस्था राखणे ही ग्रामपंचायतची आणि उद्भवलेली साथ नियंत्रणात आणणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी. परंतु प्रबोधनाचे काम दोन्ही विभाग प्रभावीपणे करू शकतात. त्यासाठीची दोघांची थेट गावपातळीवर यंत्रणा आहे. खरेतर दर पावसाळय़ापूर्वीच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने याबाबतची दक्षता घ्यायला हवी. पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी दोन्ही विभागांत समन्वय राहील याकडे लक्ष द्यायला हवे. सध्याचे हवामानही साथीच्या रोगांना आमंत्रण देणारे आहे. अजूनही चांगला पाऊस झाला नाही तर दूषित पाण्याने प्रादुर्भाव वाढणारे आहेत. सरकार विशेष मोहीम राबवायची असेल तर ग्रामसभा घेण्याची सूचना करते. अशीच एखादी ग्रामसभा पावसाळय़ापूर्वी नागरिकांच्या आरोग्यासाठी, स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी घ्यायला हवी, नाही राज्य सरकारने सूचना दिली तरी जिल्हा परिषद स्वत:च्या पातळीवर यासाठी पुढाकार घेऊ शकते. पदाधिकारी व सदस्य जागरूक असतील तर यंत्रणाही दक्ष राहते. साथ रोग नियंत्रणासाठी याचीही आवश्यकता आहे.