या जिल्ह्य़ातील जिल्हा सामान्य रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय, जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व १० ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्य़ाची रुग्णसेवा सुरू आहे, परंतु समस्त रुग्णालये डॉक्टरांविना ओसाड झाली आहेत. जिल्ह्य़ातील एकंदरीत मंजूर ९११ पदांवर केवळ ५७१ कर्मचारी असून ३४० कर्मचाऱ्यांचा अभाव असून जिल्ह्य़ातील आरोग्यसेवेची लक्तरे वेशीवर टांगल्यासारखी झाली आहेत.
जिल्ह्य़ात वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची ३५ मंजूर पदे असून केवळ १० अधिकारी असून त्यापकी २५ पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची मंजूर ८७ पदांपकी ६९ पदे भरलेली असून १८ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ च्या ५०६ मंजूर पदांपकी ३३८ पदे भरली असून १६८ कर्मचाऱ्यांचा अभाव, तर वर्ग ४ ची मंजूर २८३ पदांपकी केवळ १५३ पदे भरली असून १३० पदे रिक्त आहेत. मागास, आदिवासीबहुल, नक्षलवादग्रस्त, अशी जिल्ह्य़ाची ओळख असली तरी, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करणारा आरोग्य विभागच कर्मचाऱ्यांअभावी आजारी असल्याचे तब्बल ४० टक्के रिक्त पदांवरून निदर्शनास येते. विविध कारणाने जिल्ह्य़ातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र रुग्णसेवा ढेपाळत असल्याने जिल्ह्य़ातील १४ लाख नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा सामान्य रुग्णालयात ही बाब प्रकर्षांने जाणवते. जिल्हा रुग्णालयात वर्ग १ ची १८ पदे मंजूर आहेत. पकी केवळ ५ कर्मचाऱ्यांची पदे भरली असून १३ पदे रिक्त आहेत. वर्ग २ च्या २९ मंजूर पदांपकी २० पदे भरली असून ९ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ साठी २०३ पदे मंजूर असून केवळ १२१ पदांवर कर्मचारी असल्याने ८२ कर्मचाऱ्यांची उणीव येथे नेहमीच जाणवते. वर्ग ४ ची १३५ मंजूर असून ६७ पदे भरली असून ६८ रिक्त आहेत. एकंदरीत ३८५ मंजूर पदांपकी २१४ भरली असून १७१ पदे रिक्त आहेत.
विशेष म्हणजे, जिल्हा रुग्णालयातील सेवा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे. ग्रामीण भागातही उत्कृष्ट रुग्णसेवा देण्यासाठी देवरी, चिचगड, अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध, सडक अर्जुनी, सालेकसा, आमगाव, गोरेगाव, रजेगाव व सौंदड, अशी १० ग्रामीण रुग्णालये तयार करण्यात आली, परंतु या रुग्णालयात निम्मेच कर्मचारी असल्याने या रुग्णालयांची आरोग्यसेवा ‘रामभरोसे’ चालत आहे, तर प्रत्येकच रुग्णाला ‘रेफर टू गोंदिया’ करण्याचा नवा आजार या ग्रामीण रुग्णालयांना जडला आहे. देवरी, चिचगड, अर्जुनी मोर, नवेगावबांध, सालेकसा, आमगाव, गोरेगाव व सौंदड ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एका प्रथमश्रेणी अधिकाऱ्याचे पद रिक्त असून एकाही रुग्णालयात प्रथमश्रेणीचा कर्मचारी नाही, हे विशेष. डॉक्टर नसल्याने ग्रामीण रुग्णालयांच्या भव्य इमारती ‘शोपीस’ बनल्या आहेत. डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांच्या वाढलेल्या संख्येमुळेच जिल्ह्य़ातील शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवा कोलमंडली असून त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे.