मतदान प्रक्रियेत कोणी लाच देऊन प्रलोभन दाखवित असल्यास अथवा मतदारांना दमदाटी करून दबाव टाकत असल्यास त्याबाबत तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे. या संदर्भात तक्रार करण्यासाठी १८००२३३२०१४ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखविण्याचे प्रकार घडू शकतात. पैसे वाटप अथवा मद्य वाटप या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध केला आहे. लोकसभा निवडणुकीत असे प्रकार घडू नयेत याकरिता दक्षता घेण्याचा भाग म्हणून मतदारांना लाच देणे अथवा धमकाविणे याबद्दल तक्रारी करण्यासाठी ‘टोल फ्री’ क्रमांकाची व्यवस्था जिल्हा निवडणूक यंत्रणेने कार्यान्वित केली आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत कोणतीही व्यक्ती त्याच्या मताधिकाराचा वापर करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने रोख रक्कम अथवा कोणतेही पारितोषिक देत असेल अथवा स्वीकारत असेल तर अशी व्यक्ती एक वर्षांपर्यंतच्या शिक्षेला पात्र ठरते. तसेच कोणतीही व्यक्ती कोणत्याही उमेदवार अथवा मतदाराला अथवा कोणत्याही अन्य व्यक्तीला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा पोहोचोविण्याच्या हेतुने धमकावित असल्यास तर अशी व्यक्तीही शिक्षेला पात्र ठरते. लाच देणारा व घेणारा या दोन्हींच्या विरोधात प्रकरणांची नोंदणी करण्यासाठी तसेच मतदारांना धमकाविणे वा धाकदपटशा दाखविणे यात सहभागी असलेल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. निवडणूक काळात कोणी कोणतीही लाच देत असेल अथवा मतदारांना धमकावत असल्यास नागरिकांनी जिल्ह्याच्या चोवीस तास कार्यान्वित असलेल्या उपरोक्त क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.