सिंहस्थ कामाचे नियोजन, सिन्नर तालुक्याचा पाणीप्रश्न, भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे नूतनीकरण, औद्योगिक प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी व्यवस्था, देवळाली कॅम्प येथे क्रीडांगण व भूमिगत गटार व्यवस्था, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी.. आदी कामांसोबत नाशिक लोकसभा मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, रोजगार निर्मिती, शेती व शेतीसाठी पूरक उद्योग, पर्यटन, कला व क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी वर्षभर प्रयत्न केल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदारकीला एक वर्ष होत असल्याच्या निमित्त शुक्रवारी त्यांनी वर्षभरातील कामकाजाचा अहवाल सादर केला. वर्षभरातील त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘जयोस्तुते’ या पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना पराभूत करत गोडसे लोकसभेत पोहोचले. तत्पूर्वी या मतदारसंघावर राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व होते. त्यांच्या कार्यकाळात उड्डाणपूल, ओझर विमानतळ अशी ठळकपणे डोळ्यात भरतील अशी कामांची मोठी जंत्री होती. त्यामुळे नवनिर्वाचित शिवसेना खासदार नाशिककरांना दिलेली आश्वासने पूर्ण करतात की नाही याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. खासदारकीला वर्षपूर्ती होत असल्याचे औचित्य साधत गोडसे यांनी या काळात केलेल्या कामांची माहिती दिली. अल्प काळात आपण अपेक्षित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. लवकरच सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सहभाग नोंदविला. गोदा काठावर नव्याने बांधण्यात आलेले घाटांच्या सुशोभीकरणास पालिकेने मान्यता दिली आहे. सिंहस्थात देशभरातील लाखो भाविक रेल्वेने नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्या अनुषंगाने रेल्वे नियोजन, त्र्यंबकेश्वर व कावनई येथे विकासकामे, कुंभमेळ्यासाठी बीएसएनएलचे ५१ मनोरे उभारणी आदी कामे पाठपुराव्याअंती पूर्ण करण्यात आली याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान सहायता निधीतून मतदारसंघातील १५ रुग्णांना जवळपास १९ लाख ६९ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. सिन्नर तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सुचविलेल्या नदीजोड प्रकल्पास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. भारत प्रतिभृती मुद्रणालयातील भरती प्रक्रियेत पाच टक्के कामगारांच्या वारसांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यासाठी अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यात संबंधितांचे वय व शिक्षणाची अट शिथिल करण्यात आली. केबीसी घोटाळ्यात हजारो ठेवीदारांचे पैसे बुडाले. या प्रकरणातील संशयितांची मालमत्ता सील करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यास मदत करावी यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना साकडे घातले. भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे नूतनीकरण करण्यासाठी पुरातत्त्व विभागामार्फत प्रस्ताव तयार करून त्यास शासनाकडून मान्यता मिळवण्यात आली. औद्योगिक प्रदर्शनासाठी सैय्यद पिंप्री येथील जागेवर कायमस्वरूपी व्यवस्था केली जाणार आहे. ५० हजार लोकसंख्येच्या देवळाली गावात भूमिगत गटार व्यवस्था नाही. आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असणारी ही बाब लक्षात घेऊन छावणी मंडळाने पाठविलेल्या ६४ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन मिळाले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी, रेल्वे कर्षण कारखान्याचे विस्तारीकरण, स्मार्ट सिटीसाठीच्या स्पर्धेत नाशिकचा समावेश, राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर, टर्मिनल मार्केट आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे गोडसे यांनी नमूद केले. संसदीय चर्चेत चार वेळा लेखी, प्रश्नोत्तरात चार वेळा, तर ११२ वेळा तारांकित व अतारांकित प्रश्न उपस्थित करत त्यांनी संसदीय कामकाजात सहभाग नोंदविला.

काँक्रिटीकरणावर जोर
खासदार स्थानिक विकास निधी व जनसुविधाअंतर्गत हेमंत गोडसे यांनी मंजूर करवून घेतलेल्या कामांवर नजर टाकल्यास त्यांचा काँक्रिटीकरणावर भर असल्याचे लक्षात येते. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर मोठा निधी खर्च केला जात आहे. त्यापाठोपाठ विविध ठिकाणी सामाजिक सभागृह बांधणे, स्मशानभूमी बांधणे व नूतनीकरण, शेडचे बांधकाम आदींचा समावेश आहे. या यादीत सिद्धपिंप्री छत्रपती शिवाजी वाचनालयात पुस्तके पुरविणे हे एकमेव वेगळे काम असल्याचे दिसते.